Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावातील रावरसपुरा परिसरात ड्रेनेजलाइनच्या पाहणीवरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महापालिकेतील गटनेते गणेश लोखंडे व अर्जुन लोखंडे यांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. एका बाजूने लोखंडे यांच्यासह १५ जणांवर, तर दुसऱ्या बाजूने नदीम आणि त्यांच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. या वादामागे भूखंडाचा जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे.
फजलउल्ला मोहम्मद नदीम अजमल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते पोलीस ठाण्यात असताना नगरसेवक गणेश लोखंडे, अर्जुन लोखंडे तसेच त्यांचे दहा ते पंधरा साथीदार घरावर चालून आले. जमावाने घरासह कारची तोडफोड केली.
फजलउल्ला हे मध्यस्थी करायला गेले असता त्यांच्या डाव्या बरगडीत, पायावर तसेच हातावर चाकूचे वार करण्यात आले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरसेवकांसह 15 जणांवर याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गटाकडून नगरसेवकाचे चालक किशोर गोरख जाधव यांनी फिर्याद नोंदवली आहे. महापालिका कर्मचारी रावसपुरात ड्रेनेजची पाहणी करत असताना नदीम यांची मुले फजलउल्ला आणि रजा यांनी लोखंडे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी धारदार शस्त्रे घेऊन अंगावर धाव घेतली. मध्यस्थी करणाऱ्या किशोर यांच्या छातीवर, दंडावर तसेच तळहातावर वार करण्यात आले. जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. यावरून नदीम व त्यांच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या एकूण 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसपुरा भागातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडाच्या ताब्यावरून या दोन गटांमध्ये जुना वाद असल्याची माहिती समोर आली.
नगरसेवक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी जालना छत्रपती संभाजी नगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवलेली आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.