Aditya Thackeray- Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : आदित्य ठाकरेंनी सत्तारांचे आव्हान स्वीकारले, पण पेलणार का ?

२०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा शिवसेनेने इथे सुनील मिरकर यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा प्रचारासाठी हेलिकाॅप्टरने सिल्लोडमध्ये आले होते. (Aditya Thackeray)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील सत्तातंरानंतर शिवसेनेला सर्वाधिक धक्का दिला तो औरंगाबाद जिल्ह्याने. बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम आणि मजुबत गड असून देखील शिंदेच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार सहभागी झाले. एका अर्थाने हे शिवसेनेच्या नेतृत्वाचे अपयशच म्हणावे लागेल. आता पक्ष फुटीनंतर जिल्ह्यातील गद्दार आमदारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे-पिता पुत्रांनी कंबर कसली आहे.

आपल्यावर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी विशेषतः आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर तुटून पडलेले आदित्य ठाकरे राज्य पातळीवर देखील नेटाने किल्ला लढवत आहेत. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अनेक जाहीर सभा आणि भाषणांमधून आदित्य यांना आव्हान दिले आहे. तुम्ही वरळीतून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून देतो, मग होऊन जाऊ द्या खेळ, अशी भाषा सत्तारांकडून सुरू आहे.

छोटा पप्पू म्हणून देखील सत्तारांनी त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केला. यावर शांत बसतील ते ठाकरे कसले. सत्तारांचे सिल्लोडमध्ये येऊन शिवसंवाद यात्रा घेऊन दाखवण्याचे आव्हान स्वीकारत आदित्य ठाकरे आता सिल्लोड मोहिमेवर जाणार आहेत. सत्तार यांचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारले असले तरी ते त्यांना पेलणार का हा खरा प्रश्न आहे? राज्यातील असे अनेक विधानसभा, लोकसभा मतदारसंघ आहेत, जे युतीमध्ये भाजपच्या वाट्याला असल्याने शिवसेनेने तिथे कधी संघटन वाढवलेच नाही.

उदाहरणच द्याचे झाले तर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या दोस्तीखातर शिवसेनेने बीड जिल्ह्यात आपल्या विस्ताराला मर्यादा घालून घेतल्या होत्या. तसाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगांव या मतदारसंघाच्या बाबतीत देखील पहायला मिळतो. विधानसभेसाठी ही जागा भाजपच्या वाट्याला असल्याने शिवसेनेने या मतदारसंघाकडे कायम दुर्लक्ष केले. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपलीकडे इथे शिवसेनेचे संघटन कधीच वाढले नाही. त्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची पडद्यामागची मैत्री या मतदारसंघात तिसऱ्या कुणाला वाढू देत नाही हा आजपर्यंतचा इतिहास.

२०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा शिवसेनेने इथे सुनील मिरकर यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा प्रचारासाठी हेलिकाॅप्टरने सिल्लोडमध्ये आले होते. तेव्हा शिवसेनेच्या उमदेवाराला १५ हजार मते मिळाली होती. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्यामुळे सत्तार साडेतेरा हजार मतांनी विजयी झाले होते. संघटन नसतांना मिरकर यांना पंधरा हजार मते कशी मिळाली याची चर्चा देखील तेव्हा चांगलीच रंगली होती. या उलट सत्तारांच्या विरोधात भाजपने कुमकूवत उमेदवार द्यायचा आणि त्या बदल्यात सत्तारांनी लोकसभेत रावसाहेब दानवेंना मताधिक्य मिळवून द्यायचे, असा अलिखित करार सत्तार-दानवे यांच्यात झाल्याचे बोलले जाते. अनेक निवडणुकांमध्ये ते प्रत्यक्षात उतरल्याचे देखील पहायला मिळाले.

त्यामुळे सत्तार या मतदारसंघातून दोनदा काॅंग्रेसच्या तिकिटावर तर २०१९ मध्ये भाजपमधील प्रवेश हुकल्याने राजकीय सोय म्हणून शिवसेनेच्या उमेदवारीवर तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. २०१४ चा अपवाद सोडला तर आघाडी सरकारमध्ये दोनवेळा मंत्री राहिलेल्या सत्तारांनी त्याचा पुरेपूर वापर करत मतदारसंघाची मजबुत बांधणी केली. सर्व जाती-धर्मांच्या लोकांशी असलेला दांडगा संपर्क आणि त्याला विकासकामांची जोड ही सत्तार यांची खरी ताकद समजली जाते. राजकारणात कुरघोडी करण्यात तरबेज असलेल्या सत्तारांकडे मतदारसंघातील सगळी सत्ता एकवटलेली असल्याने तिथे फक्त त्यांचाच शब्द प्रमाण मानला जातो.

साम, दाम, दंड, भेद याभोवतीच त्यांचे राजकारण चालते. वादग्रस्त तितकेच लोकप्रिय असल्यानेच कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल, हा त्यांचा आत्मविश्वास अनेकांना ओव्हरकाॅन्फिडन्स वाटत असला तरी तीच परिस्थिती आहे. सत्तार यांना कुठल्याच पक्षाची गरज पडू नये, आपण म्हणजेच पक्ष अशी मोनपल्ली त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे सत्तारांच्या मतदारसंघात जावून त्यांनाच आव्हान देणे ठाकरेंना तितके सोपे नाही. पैठण किंवा शहरातील पश्चिम मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेची ताकद मोठी आहे. तिथे भुमरे, शिरसाटांना रोखणे किंवा पराभूत करणे एकवेळ शक्य होईल. पण सिल्लोडमध्ये जाऊन सत्तारांना पराभूत करणे यासाठी चमत्कारच घडायला हवा.

सत्तारांचे राजकारण, त्यांचे शक्तीप्रदर्शन आणि जे पाहिजे ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरतात. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघातील सत्कार असो की मग मुंबईत जाऊन शक्तीप्रदर्शन, दसरा मेळाव्याला गर्दी जमवणे यातून सत्तार यांनी वारंवार आपली शक्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा सिल्लोडमधील दौरा आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

आतापर्यंत शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांवर बाहेरून गर्दी जमल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक नेते करत आले आहेत. परंतु सिल्लोडच्या शिवसंवाद यात्रेसाठी स्थानिक नेत्यांना देखील तेच करावे लागणार असे दिसते. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील स्थानिक लोक ठाकरेंच्या मेळाव्याला हजेरी लावून सत्तारांचा रोष ओढावून घेणार नाहीत. त्यामुळे शेजारच्या कन्नड, फुलंब्री आणि शहरातूनच सिल्लोडमध्ये गर्दी जमवावी लागेल. त्यामुळे सत्तारांना आव्हान देण्यापेक्षा सिल्लोडमध्ये गर्दी जमवून तो मेळावा यशस्वी करण्याचे शिवधनुष्य देखील स्थानिक नेत्यांना उचलले तरी खूप झाले असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT