Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News Sarkarnma
मराठवाडा

Shivsena : अंबादास दानवे म्हणाले, हो भुमरे नमकहरामच..

भुमरेंसोबत त्यांचा मुलगा, भाऊ, पुतण्या असतो मग ते कोणते गोचीड आहे? असा सवाल करतांनाच ज्यांनी आमदारकी, मंत्रीपद दिलं, त्यांच्यावरच टीका करणे याला नमकहरामीच म्हणतात. (Shivsena)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिंदेसेनेच्या काल शहरात झालेल्या मेळाव्यात राज्याचे रोहयो व जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावर (Shivsena) शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी मंजुर केलेल्या योजनाच लोकांना सांगून पुन्हा त्यांच्यावरच टीका करणे म्हणजे नमकहरामी नाही तर काय आहे? त्यामुळे पुन्हा सांगतो भुमरे हे नमकहरामच आहे, असा टोला दानवे यांनी लगावला.

ज्या भुमरेंना शिवसेनेने सहावेळा उमेदवारी दिली, पाच वेळा निवडून आणले, कॅबिनेट मंत्री केले तेच भुमरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. (Marathwada) त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी काय केले विचारतात? आज ज्या योजना किंवा प्रकल्प भुमरेंच्या मतदारसंघात सुरू आहेत किंवा मंजुर झालेत त्याला निधी आणि मान्यता ही मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनीच दिलेली आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांना काय दिले? हे विचारले पाहिजे. उद्धव ठाकरेंनी मंजुर केलेल्या योजनाच लोकांना सांगून पुन्हा त्यांच्यावरच टीका करणे म्हणजे नमकहरामी नाही तर काय आहे? याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला.

येत्या ५ आॅक्टोबर रोजी मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना आमने-सामने असणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी दोन्ही बाजूंनी सुरू आहे. त्यासाठी आढावा बैठका, मेळाव्यांमधून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम देखील सुरू आहे. शिंदे सेनेच्या काल झालेल्या मेळाव्यात मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांनी शिवसेनेवर व स्थानिक नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यात भुमरे आघाडीवर होते. अंबादास दानवे यांनी भुमरेंचा समाचार घेतांना त्यांना पुन्हा एकदा नमकहराम म्हणत डिवचले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या लोकांचा उल्लेख गोचीड असा करणाऱ्या भुमरेंसोबत त्यांचा मुलगा, भाऊ, पुतण्या असतो मग ते कोणते गोचीड आहे? असा सवाल करतांनाच ज्यांनी आमदारकी, मंत्रीपद दिलं, त्यांच्यावरच टीका करणे याला नमकहरामीच म्हणतात.

आदित्य ठाकरे यांच्या बिडकीनच्या सभेचा उल्लेख भुमरे यांनी गारुड्याचा खेळ पहायला देखील लोक येतात असे म्हणत टिंगल उडवली होती. त्यालाही दानेव यांनी प्रत्युत्तर दिले. तुम्हाला बिडकीनमध्ये गारुड्याचा खेळ का करता आला नाही? मंत्री असतांना राज्यात ज्यांना ज्यांना पाणंद रस्ते दिले, त्या सगळ्यांना पैठणमधील मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला लोक आणायला सांगितले. अगणवांडीसेविकांना आणले गेले? आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, त्यामुळे ज्यांना दीड दीड हजारांचे पॅकेज देवून गर्दी जमवावी लागते, त्यांनी आदित्य ठाकरेंच्या गर्दीवर बोलू नये. आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत, त्या काढायला लागलो तर तुमचे अवघड होईल, असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT