MLA Santosh Bangar News : Shiv Sena Political News  Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Bangar News : 'बाळासाहेब ठाकरेंनी महापाप केले... ; आमदार संतोष बांगरांची जहरी टीका!

Shiv Sena Political News : "बांगर यांच्या खिशात मटक्याच्या चिठ्ठ्या सापडतात..."

संदीप नागरे

Mumbai News : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर आहेत. आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदारसंघात ठाकरेंनी जनसंवाद सभा घेत, "खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर या गद्दारांना पाडा," असे आवाहन केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बांगर यांच्या खिशात मटक्याच्या चिठ्ठ्या सापडतात, अशी टीका केली. यावर भडकलेल्या बांगर यांनी उद्धव ठाकरे, अंबादास दानवे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Latets Marathi News)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवून महापाप केले. आम्हाला पाडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे गटाचा कोणीही उभा राहू द्या, त्याला चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान बांगर यांनी माध्यमाशी बोलताना दिले, तर अंबादास दानवे हे कोणत्याही क्षणी शिंदे गटात येतील, असा दावा करत त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा हवा दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी हिंगोलीच्या कळमनुरी शहरात जाहीर सभा घेतली. आमदार संतोष बांगर यांना निवडणुकीत तिकीट देण्याचे मी महापाप केलं होतं. आता या निवडणुकीत खासदार हेमंत पाटील यांच्यासह संतोष बांगर यांना धडा शिकवा, असे आवाहन केले होते. ठाकरे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही इतर आमदारांच्या खिशामध्ये विकासकामांच्या चिठ्ठ्या असतात, मात्र संतोष बांगर यांच्या खिशामध्ये मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या असतात, असा टोला लगावला होता.

या टीकेनंतर भडकलेल्या बांगर यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात देऊन महापाप केले, असे म्हणत आपल्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले, तर अंबादास दानवे यांना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरातून उमेदवारी द्यायला काय हरकत आहे ? असे सुचवत खैरे-दानवे वादामध्ये तेल ओतण्याचे काम केले.

शिवाय लवकरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेत दिसतील, असा दावाही केला. गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे यांच्यात वादाच्या चर्चा होत्या. या वादावर उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही समज देऊन पडदा टाकला.

उमेदवारी न मिळाल्याने दानवे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील आणि लोकसभा लढवतील, अशा चर्चांनाही उधाण आले होते. यावर दानवे यांनी मी शिवसैनिक आहे आणि कायम शिवसैनिकच राहणार, असे स्पष्ट करत शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु संतोष बांगर यांनी पुन्हा दानवे यांच्या शिंदे गटातील (Eknath Shinde) प्रवेशाबद्दल भाष्य करत त्यांच्याबद्दलचा संशय कायम ठेवला.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT