Eknath Shinde-Abdul Sattar  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : सत्तारांचे बंड, शिंदेंकडून कानउघाडणी अन् शिवसेनेत 'हम साथ साथ है'चा सूर!

Shiv Sena unity after Abdul Sattar rebellion : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत एकीची हाक देण्यात आली आहे. अब्दुल सत्तारांच्या बंडानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि नेत्यांची बैठक घेऊन कानउघाडणी केली.

Jagdish Pansare

Chhatrapati Smbhajinagar News : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाकडून सपाटून मार खाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांचे डोळ आता कुठे उघडले आहेत. अर्थात त्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांना बंडाचे निशाण फडकवावे लागले. भाजपा कशी शिवसेना संपवत आहे, हे सांगावे लागले. पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व सहा आमदार, एक खासदार यांना ठाण्यात बोलावून घेतले. मध्यरात्री उशीरापर्यंत सगळ्याची कानउघाडणी केली.

परिणामी जिल्ह्यात कधीच एकमेकांचे तोंड न पाहणारे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार हे आज एकाच गाडीतून फिरताना दिसले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. अडीच वर्ष पक्षांतर्गत संघर्ष, स्थानिक नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण याचा पुरेपूर फायदा मित्रपक्ष भाजपाने उचलला. मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला मागे टाकत जिल्ह्यातील महत्त्वाच्या दोन स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाने शतप्रतिशत ताब्यात घेतल्या.

महापालिका, जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे चांगले संख्याबळ असताना भाजपाने त्यांना सत्तेबाहेर ठेवले. शिवसेनेकडे असलेली जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागाही संख्याबळाचा आकडा दाखवत हिसकावून घेतली. यातून भाजपाने आमचे हातपाय तोडले, आता ते आमचं मुंडक उडवण्याच्या तयारीत असल्याचा घणाघात अब्दुल सत्तार यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत मुलाला बंडखोरी करायला लावत भाजपा आणि शिवसेनेतील पक्षांतर्गत विरोधक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही दबाव वाढवला.

पक्ष संपत असल्याची काळजी दाखवत अब्दुल सत्तार यांनी दबावतंत्रातून आपले इप्सीतही साध्य करून घेतले. पालकमंत्री संजय शिरसाट यांना लगाम घालण्यातही सत्तार यांना यश आले. जिल्ह्यातील ज्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला होती, ती एकाच दिशेने वळवण्याचा आणि जिल्हा बँकेत आपल्याला हवे ते घडवण्याचा सत्तार यांचा डावा यशस्वी होताना दिसतो आहे. शिंदे यांनी सत्तार-शिरसाट यांच्यातील वाद पाहता जिल्हा बँकेच्या राजकारणापासून त्यांना दूर ठेवले.

जिल्हा बँकेत संचालक असलेल्या अनुभवी संदीपान भुमरे यांच्यावर महायुतीत निवडणूक लढवण्याची जबाबदारी टाकली. त्यानंतर दोन दिवसात सत्तार दोन वेळा भुमरे यांच्या संपर्क कार्यालयात गेले. आज पालकमंत्री संजय शिरसाट हे देखील त्यांना सहभागी झाले. जिल्ह्यातील शिवसैनिकांना सुखावणारे चित्र हे यापुढेही कायम राहील का? हा खरा प्रश्न आहे. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार हे एकाच गाडीतून आलेले पाहून माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले.

गाडीतून उतरताच शिरसाट-सत्तार यांनी 'हम साथ साथ है' चा सूर आळवला. एकनाथ शिंदे यांनी सहा आमदार, एक खासदार अशा सगळ्यांना एकजुटीने जिल्ह्यात काम करण्याचे आदेश दिले आहेत. आमच्यातील मतभेद आता मिटले आहेत, असे शिरसाट यांनी हसत माध्यमांना सांगीतले. आमच्यात पुन्हा मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, तुम्हीही ती घ्या, असा टोला अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना लगावला. एकूणच शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्र यायला विधान परिषद निवडणुक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मुहूर्त यावा लागला, असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT