औरंगाबाद : दोन वर्षापुर्वी भाजपमध्ये शहराध्यक्ष असलेले किशनचंद तनवाणी पुन्हा स्वगृही म्हणजे (Shivsena) शिवसेनेत मोठ्या पदाच्या अपेक्षेने प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे पद आणि सुत्र आपल्या हाती ठेवण्याच्या उद्देशाने तनवाणी शिवसेनेत दाखल झाले, पण कोरोनाने त्यांच्या सगळ्या आशा धुळीस मिळवल्या. महापालिकेची निवडणूक थोडीथिडकी नाही तर तब्बल अडीच वर्ष रखडली. (Aurangabad) त्यामुळे भाजपमध्ये मानाचे स्थान सोडून शिवसेनेत परतलेल्या तनवाणी यांचा भ्रमनिरास झाला होता.
आता दोन वर्षानंतर तनवाणी यांना पक्षाने पद दिले आहे, मात्र जिल्हाप्रमुख पदाकडे डोळे लावून बसलेल्या तनवाणींची महानगरप्रमुख पदावर बोळवण करण्यात आली आहे. मुंबईत पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे व जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत तनवाणी यांना अखेर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या आधी मध्यचे बंडखोर शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे हे पद होते.
किशनचंद तनवाणी हे तसे मुळचे शिवसेनेचे. जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. २०१४ मध्ये शिवसेनेकडून मध्य मतदारसंघातून ते इच्छूक होते, पण उमेदवारी प्रदीप जैस्वाल यांना मिळाली. राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे भाजपने तनवाणी यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले आणि दोघांच्या भांडणात एमआयएमचे इम्तियाज जलील आमदार झाले होते.
त्यानंतर भाजपमध्ये तनवाणी यांना शहराध्यक्षपद देण्यात आले होते. तनवाणी यांनी भाजपमध्ये देखील आपले संघटन कौशल्य दाखवत पक्षाची ताकद शहरात चांगलीच वाढवली. पण कालांतराने तिथेही त्यांची घुसमट होऊ लागली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुका वेळेवर झाल्या असत्या तर कदाचित तनवाणी यांची घरवापसी यशस्वीही ठरली असती. पण कोरोना महामारीने त्याकाळात पक्षांतर केलेल्या सगळ्याच राजकीय नेत्यांची गोची झाली.
शिवसेनेत परतल्यानंतर पक्षाकडून कुठलीच जबाबदारी मिळत नसल्याने तनवाणी अस्वस्थ होते. यातून त्यांनी शिवसेनेच्या बैठका, मेळावे याला जाणे देखील बंद केले होते. आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात होती, पण दुसरा पर्याय नसल्यामुळे ते शांत बसून होते. गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदार १२ खासदारांनी बंड केले आणि ठाकरे सरकार कोसळले.
औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल पाच आमदार शिंदेंसोबत गेले आणि तनवाणी यांच्या पदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. दरम्यान, शिवसेनेत तीन जिल्हाप्रमुख नेमण्याची चर्चा सुरू होती. ग्रामीणसाठी दोन आणि शहरासाठी एक. तनवाणी हे देखील जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छूक होते. परंतु राज्यातील शिंदे बंडानंतर अनेक राजकीय गणित बिघडली, त्या तिसऱ्या जिल्हाप्रमुखाची चर्चा देखील थंडावली.
प्रदीप जैस्वाल यांनीही बंडखोरी केल्यामुळे आणि त्याच दरम्यान, शहरात तनवाणी समर्थकांनी देखील `साहेब आता निर्णय घ्याच`, अशी बॅनरबाजी करत दबाव वाढवला होता. जैस्वालांच्या बंडामुळे महानगरप्रमुख पद रिक्त असल्यामुळे काल उद्धव ठाकरे यांनी या पदावर तनवाणी यांची निवड केली. दोन वर्ष कुठलीच जबाबदारी नसल्यामुळे नाराज असलेल्या तनवाणी यांना या नव्या जबाबदारीने दिलासा मिळाला असला तरी ते समाधानी निश्चितच नाहीत, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.