Ambadas Danve’s reported meeting with former MLA Harshvardhan Jadhav has triggered strong reactions from Shiv Sena UBT leader Chandrakant Khaire, reviving old disputes within the party. Sarkarnama
मराठवाडा

ShivSena UBT : खैरेंच्या कट्टर शत्रूची अंबादास दानवेंनी घेतली भेट, पक्षप्रवेशाच्याही चर्चा : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा वादळ

Chandrakant Khaire : माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भेट घेतली. या भेटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा वादंग सुरू झाला आहे. जाधवच्या संभाव्य पुनर्प्रवेशावरून चंद्रकांत खैरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. तत्कालिन खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जाधव यांनी मतदारसंघाचा निकाल फिरवला होता. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंचा हिंदू मतांमध्ये फूट पडल्याने पराभव झाला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता, तेव्हापासून हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यातून विस्तवही जात नाही. आता त्याच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतीच हर्षवर्धन जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. दानवे-जाधव भेटीमुळे हर्षवर्धन यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. नेमकं यावरूनच चंद्रकांत खैरे यांचा संताप झाला आहे. ज्या हर्षवर्धन जाधवने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा अपमान केला, त्यांच्याबद्दल वाईट शब्द काढले, उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवरची टीका केली, शिवसेनेशी गद्दारी केली त्या हर्षवर्धन जाधवची आपल्याला गरज काय?

कन्नडमध्ये आपल्याकडे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. आमचा एकनिष्ठ माजी आमदार उदयसिंह राजपूत, डाॅ. अण्णासाहेब शिंदे व इतर पदाधिकारी पक्षासोबत असताना या गद्दाराची आपल्याला गरज काय आहे? तो एवढा मोठा लागून चालला का? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. अंबादास दानवे हा शिवसेनेचा नेता आहे, त्याला हर्षवर्धन जाधवच्या घरी जाण्याची गरज काय होती? बोलायचेच होते तर त्याला कार्यालयावर बोलावून घ्यायचे होते? अशा शब्दात खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली.

महिलांचा सातत्याने अपमान,कन्नडच्या विद्यमान महिला आमदार यांच्याविषयी हर्षवर्धन जाधवची भाषा चीड आणणारी आहे. अशा माणसाची पक्षाला अजिबात गरज नाही? कोणत्याही परिस्थिती त्याला मी पक्षात घेऊ देणार नाही, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. एकूणच हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षात वादळ आणि वाद निर्माण होताना दिसतो आहे.

हर्षवर्धन जाधवांना हवे पक्षाचे लेबल..

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेविरोधात बंड, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एका सभेत केलेले असभ्य विधान याचा फटका हर्षवर्धन जाधव यांना विधानसभा निवडणुकीत बसला होता. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेत पराभव झाल्यानंतर जाधव राजकारणातून बाहेर फेकले गेले. 2024 मध्ये पुन्हा त्यांनी कन्नडमधून नशिब आजमावले, पण रावसाहेब दानवे यांच्या खेळीने पुन्हा आमदार होण्याचे जाधव यांचे स्वप्न धुळीस मिळाले. संजना जाधव यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देत रावसाहेब दानवे यांनी मुलीला कन्नडमधून आमदार केले.

विधानसभा निवडणुक होऊन एक वर्ष उलटल्यानंतर हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकाणात सक्रीय झाले आहेत. कन्नड नगरपालिकेसह मतदारसंघातील प्रश्नांवरून ते सातत्याने सरकार आणि विद्यमान आमदार संजना जाधव यांच्यावर टीका करत असतात. 2029 मध्ये कन्नडमधून पुन्हा निवडणूक मैदानात उतरण्याच्या दृष्टीने एखाद्या पक्षाचे लेबल असावे, असा त्यांचा प्रयत्न दिसतो.

शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिलेले माजी आमदार उदयसिंह राजपूत यांचा 2024 मध्ये पराभव झाला. आता 2029 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा पक्षात आणण्याचा अंबादास दानवे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. मात्र दानवे यांच्या या प्रयत्नात चंद्रकांत खैरे यांना मोठा अडथळा असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT