Shivsena UBT News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : जिथे लोकसभेचा पराभव, त्याच संभाजीनगरातून ठाकरे विधानसभेचे रणशिंग फुंकणार..

Chhatrapati Sambhajinagar Politics : लोकसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात 104 सभा घेतल्या होत्या.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : पक्ष फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात नऊ खासदार निवडून आणत आपला ब्रॅन्ड सिद्ध केला आहे. आता यापेक्षा अधिक ताकदीने आगाम विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्याच्या सत्तेत कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. उद्या (ता.7) रोजी आपल्या राज्यातील शिवसंकल्प दौऱ्याची सुरूवात उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमधून करत आहेत.

या पहिल्या मेळाव्यातून ठाकरे गट विधानसभा निवडणुकीच रणशिंग फुंकणार आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मेळाव्याच्या पुर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्‍न, राजकीय विषयावर चर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील तीन हजार बुथप्रमुख, 1200 शाखाप्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हा मेळावा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठीच असल्याचे दानवे यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यभरात 104 सभा घेतल्या होत्या. त्यानुसार विधानसभेसाठी देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या विधिमंडळ व लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर राज्यभर शिवसेना ठाकरे गटाचे मेळावे सुरू होतील.

पक्षाने राज्यातील 288 जागांच्या अनुषंगाने आढावा घेतला आहे. प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांची यादी तयार आहे. पक्षाची ताकद पाहता जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत, जिल्ह्यात सात किंवा आठ जागा लढण्याची तयारी असल्याचे दानवे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसैनिकांमध्ये नैराश्‍य आहे.

गेल्यावेळी देखील पराभव झाल्यानंतर अशाच प्रकारचे वातावरण होते, त्यानंतर विधानसभेला आम्ही सहा जागा जिंकल्या होत्या. यावेळी फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही भरारी घेऊ, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे रविवारी काही माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उद्या प्रवेश होतील पण शिंदे यांचा नाही तर इतर महत्त्वाचे प्रवेश होणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. काही महिला पदाधिकारी पक्षाला सोडून गेल्या, त्यांची दखल घेण्याची गरज नाही, पण आगामी काळात पक्षात मोठ्याप्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचा दावा दानवे यांनी केला.

काय असणार मेळाव्यात..

रविवारी होणाऱ्या मेळाव्यात सुरवातीला निवडणूक प्रशिक्षक वैभव वाघ हे ‘चला जिंकू या’या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर बळीराजाचा वाली कोण? या विषयावर उपनेते लक्ष्मण वडले, आमदार उदयसिंग राजपूत, कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांची भाषणे होतील. महिलांच्या विषयांवर ‘संघर्ष करीन, लढत राहील, मी रणरागिणी’ या विषयावर ज्योती ठाकरे तसेच ‘हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे’या विषयावर अंबादास दानवे व शेवटी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे ‘राजकीय आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT