Bjp News, Aurangabad
Bjp News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Bjp : शहर-जिल्हाध्यक्ष पद नियुक्तीतही धक्कातंत्र, चर्चेत नसलेल्या नावावर शिक्कामोर्तब..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : देश व राज्य पातळीवर धक्कातंत्राचे राजकारणात निपूण असलेल्या भाजपने आता हीच पद्धत स्थानिक पातळीवर देखील राबवायला सुरू केली की काय? असा प्रश्न औरंगाबाद शहर-जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पडतो. भाजपचे संजय केणेकर यांना पक्षाने प्रदेश सरचिटणीस पदी बढती दिली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादचे शहर-जिल्हाध्यक्षपद रिक्त होते.

या पदावर वर्णी लागावी यासाठी पक्षात मोठी स्पर्धा होती. पण स्पर्धेतील सगळ्यां नावांना मागे टाकत भाजपचे राज्य प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी बाजी मारली. (Bjp) विशेष म्हणजे या स्पर्धेत त्यांचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह माजी शहर-जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्याकडून अनेक नावांची शिफार आणि आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरण्यात आला होता. (Aurangabad) पण सगळ्यांवर मात करत शिरीष बोराळकर यांनी बाजी मारली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी बोराळकर यांना आज नियुक्तीचे पत्र पाठवत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिरीष बोराळकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. पक्षात विविध पद भूषवतांनाच त्यांच्यावर राज्य प्रवक्ते म्हणून देखील जबाबदारी आहे. खेळाडू असलेल्या शिरीष बोराळकरांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तीनवेळा लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक अशी ओळख असलेल्या बोराळकर यांनी शहर-जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी फडणवीसांचा आदेश शिरसावंद्य मानत स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना त्यांना मदत करावी लागणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर झालेली बोराळकर यांची निवड ही महत्वाची समजली जाते. गेल्या महिनाभरापासून शहर-जिल्हाध्यक्षपदावरून भाजपमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळाली होती.

प्रमोद राठोड, समीर राजूरकर, राजू शिंदे, किशोर शितोळे, बापू घडामोडे, दिलीप थोरात, शिवाजी दांडगे, अनिल मकरिये अशी मोठी यादी होती. यातील आपल्या पंसतीच्या नावांसाठी दानवे, कराड, सावे, बागडे केणेकर यांनी आपल्या समर्थकांसाठी शक्तीपणाला लावली होती. या शिवाय स्थानिक पातळीवर शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांपैकी एकाने सर्व्हे देखील केला होता. हा प्रकार पक्षश्रेष्ठींना पटला नाही.

यावर अधिक वाद किंवा चर्चो नको म्हणून आज तातडीने शिरीष बोराळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बोराळकर स्पर्धेत नसतांना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या निवडीमागे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छाच महत्वाची ठरली. आता फडणवीसांच्या इच्छेने शहर-जिल्हाध्यक्ष झालेल्या बोराळकरांना इच्छुक पदाधिकारी, व कार्यकर्ते किती सहकार्य करतील, यावर बोराळकरांची पुढची वाटचाल ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT