Ausa Local Body News Sarkarnama
मराठवाडा

Ausa Political News : माजी नगराध्यक्षांमध्ये सोशल वॉर; एकाचे 'भोंको' आंदोलन तर दुसरा टाकणार 'बिस्कीट'

Social media war between BJP and NCP in Ausa city : एकूणच गेल्या दोन दिवसात शहरातील श्वानांनी औशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापविल्याचे दिसत आहे.औशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा मध्ये नेहमी संघर्षच पाहायला मिळाला आहे.

Jagdish Pansare

जलील पठाण

औसा : गेल्या दोन दिवसापासून औसा शहरातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी शहरात असलेल्या अनेक समस्यांना धरून भाजपला टार्गेट केले आहे. शहरात मोकाट श्वानांचा झालेला सुळसुळाट आणि या श्वानांनी अनेकांना जखमी केल्याच्या कारणावरून अफसर शेख यांनी 'भाजपा हटाव औसा बचाव'नारा देत 'भोंको' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्याला प्रतिउत्तर देतांना भाजपाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांनी 'बिस्कीट फेको' आंदोलन करण्याचा इशारा देऊन एक प्रकारे अफसर शेख यांना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. (NCP) सध्या आमदार अभिमन्यू पवार हे शहराच्या विकासासाठी आराखडा तयार करीत असतांना मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोकांसमोर उघडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

एकूणच गेल्या दोन दिवसात श्वानांनी औशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापविल्याचे दिसत आहे.औशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा मध्ये नेहमी संघर्षच पाहायला मिळाला आहे. (BJP) गेल्या काही दिवसापासून शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाला असून या श्वानांनी अनेकांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. औशाचे आमदार भाजपाचे असल्याने पालिकेमध्ये त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे चालते.

येणाऱ्या काही दिवसात नगर पालिकेची निवडणूक लागू शकते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी नेमका श्वानांच्या या उपद्रवाचा मुद्दा उपस्थित करून या विरोधात 'भोंको' आंदोलन करण्याचा इशारा देत भाजपच्या कारभारावर बोट ठेवले. या आणि अन्य समस्या बाबत त्यांनी भाजपाला जबाबदार धरत औशातून भाजपा हटाव असा नारा दिला.

सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली. शेख यांच्या पोस्ट मुळे खवळलेल्या भाजपाच्या माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांनी नगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या 'भोंको' आंदोलनाला 'बिस्कीट' फेको आंदोलनाने प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. अफसर शेख यांच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोन माजी नगराध्यक्षांमध्ये सुरू असलेल्या सोशल वॉर मुळे औसेकरांची चांगलीच करमणूक होत आहे.

किरण उटगे यांच्या बिस्कीट फेको आंदोलनाच्या पोस्टला अफसर शेख यांनी शहरात वाढलेल्या श्वानांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे, अन्यथा हे रस्त्यावर फिरू देणार नाहीत, अशा आशयाची पोस्ट व्हायरल केली आहे. प्रश्न भटक्या श्वानांचा असला तरी त्याला राजकीय रंग कसा द्यावा? हे औशातील नेत्यांकडून इतर जिल्ह्यातील नेत्यांना शिकण्यासारखे आहे, अशी चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT