railway track  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Railway News : रखडलेल्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाला येणार वेग

Political News : अंतरीम अर्थसंकल्पात 225 कोटी रुपयांची तरतूद या रेल्वे मार्गासाठी केली आहे.

Sachin Waghmare

Dharashiv News : गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग नजरेच्या टप्प्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची सत्तापालट झाल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने राज्य सरकारच्या वाट्याचा 50 टक्के हिस्सा मंजूर केला होता. त्या पाठोपाठ केंद्र सरकारनेही आता अंतरीम अर्थसंकल्पात 225 कोटी रुपयांची तरतूद या रेल्वे मार्गासाठी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात 225 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर राज्याचा 50 टक्के हिस्स्याचे 452 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रेल्वेने 544 कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रकाशित केली आहे. आता अंतरिम अर्थसंकल्पात यासाठी केलेल्या तरतुदीमुळे या प्रकल्पाला अधिक गती मिळेल.

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी दिली. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण 84.44 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील एक हजार 375 एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील 15 गावांमधील 494.26 हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आहे. रेल्वेमार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी 452.46 कोटी रूपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतरिम अर्थसंकल्पात याला 225 कोटींची तरतूद

आता अंतरिम अर्थसंकल्पात याला 225 कोटींची तरतूद केल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वेमार्ग पूर्णत्वाच्या टप्प्यावर आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राज्य सरकारच्या हिश्श्यातील 50 टक्के निधी रखडला होता. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जोडणार्‍या रेल्वेमार्गाच्या कामाला उशीर झाला. ठाकरे सरकारच्या कालावधीत निधी उपलब्ध करून दिला असता तर तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेच्या नकाशावर येण्यासाठी एवढा विलंब लागला नसता, अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT