MSRTC (S.T)
MSRTC (S.T) Sarkarnama
मराठवाडा

एसटी कर्मचारी आक्रमक, आम्हाला फासावर लटकवले तरी आता माघार नाही

सरकारनामा ब्यूरो

बीड : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी (S.T) कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्य सरकारने (State Government) कडक भूमिका घेत, राज्यभरातील काल (ता.9 नोव्हेंबर) ३७६ एसटी कर्मचारी तर, आज (ता.10 नोव्हेंबर) पुन्हा 63 आगारातील 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 918 वर पोचली आहे. यामुळे आता आंदोलक कर्मचारी अजूनच आक्रमक झाले आहे. या घडामोडीमुळे हा संप अजूनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमचे शासनात विलीनीकरण करा, ही मागणी घेऊन गेल्या आठ दिवसांपासून, एसटी कर्मचाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व डेपो बंद ठेवून, बेमुदत संप सुरू केला आहे. आता या आंदोलक संपकरी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बीड आगारातील सहा कर्मचाऱ्यांना आज (ता.10 नोव्हेंबर) निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र, ही नोटीस आल्यानंतर येथील कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहेत.

याबाबत बीड आगारातील एसटी कर्मचारी पठाण रियाज म्हणाले, गेल्या 8 दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. माझ्या कुटुंबात आई-वडील मूलबाळ आहेत, आमची एकच मागणी आहे की, आमचे शासनात विलीनीकरण करा. यावर तोडगा काढायचा सोडून प्रशासनाने मला बक्षीस म्हणून निलंबनाची नोटीस दिलीय. मात्र, ही प्रशासनाची कारवाई किरकोळ असून "आम्हाला फासावर लटकवले तरी, आता माघार घेणार नाहीत". जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार नाही. असा इशारा निलंबनाची नोटीस आल्यानंतर कर्मचारी पठाण यांनी दिला आहे. तर, दुसरे आंदोलक रमेश खेडकर म्हणाले की, प्रशासनाने असे पाच सहा लोकांना निलंबित करण्यातपेक्षा, आमच्या बीड आगारातील 425 कर्मचाऱ्यांना सोबतच निलंबित केले तरी चालेल, मात्र या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाहीत, असा संतप्त इशारा दिला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पाठीमागे घ्यावे आणि कामावर रूजू व्हावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंनी आज (ता.10 नोव्हेंबर) दुपारी केले होते. मात्र, एसटी कामगार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने महामंडळाकडून सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

विश्रामतीगृहातून एसटी कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकानी काढले बाहेर

वसई- विरार - नालासोपारा एसटी आगारातील विश्रामतीगृहातून एसटी कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकानी बाहेर काढले. संपूर्ण राज्यभर एसटी कर्मचारी यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यात नालासोपारा एसटी आगारात देखील गेल्या 13 दिवसंपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, आज सायंकाळी 6 च्या सुमारास एक वेगळा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा आगारातील विश्रांतीगृहातुन एसटी कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांनी बाहेर काढले व विश्रांती गृहाला टाळा लावला आहे. उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारांनी यावेळी ठिया आंदोलन करत राज्यसरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT