Abhay Salunke, Ashok Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Nilanga Congress Politics : निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर...

Abhay Salunke Vs Ashok Patil Nilangekar : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुंके यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

राम काळगे

Nilanga News, 03 Dec : लोकसभेला प्रचंड यश मिळालेल्या काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीत मात्र पानिपत झालं. विधानसभेतील पराभव काँग्रेस (Congress) नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवाय या पराभवाचं खापर आता नेत्यांकडून एकमेकांवर फोडलं जात आहे.

अशातच आता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुंके (Abhay Salunke) यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

अभय साळुंके यांनी 18 नोव्हेंबरच्या प्रचार सभेत निलंगा येथे माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप करत अशोक पाटील निलंगेकर यांनी साळुंके यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मंगळवारी (ता. 03 डिसेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

तसंच यावेळी त्यांनी आपण कधीच काँग्रेस (Congress) सोडणार नसल्याचंही जाहीर केलं. ते म्हणाले, "माझ्या रक्तात आणि नसानसात काँग्रेस आहे. मी काँग्रेसला सोडलं नाही तर काँग्रेसने मला सोडलं आहे. माझी काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र, निष्ठावंताची हकालपट्टी करणारे उपरे कोण? असा सवाल पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला.

ते म्हणाले, निलंगा विधानसभा मतदारसंघात (Nilanga Assembly Constituency) उमेदवारी देताना काँग्रेस पक्षाकडून आलेल्या निरीक्षकांसमोर मी माझी बाजू मांडली. यावेळी मतदारसंघातून 12 इच्छुकांपैकी 8 जणांनी मला पाठिंबा दिला होता. पक्षाकडून मला उमेदवारी देखील दिली जाणार होती. पण कुठे माशी शिंकली हे कळलं नाही. सगळे सर्व्हे माझ्या बाजूने असतानाही निष्ठावंतना डावलून उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमधील हजारो कार्यकर्त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत दुःख व्यक्त केलं.

मात्र, सर्वांच्या आग्रहामुळे आणि वरिष्ठांच्या विनंतीमुळे मी माझी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला आणि आघाडी धर्म पाळला. परंतु 18 नोव्हेंबर रोजी निलंगा येथील एका सभेतून अभय साळुंकेंनी माझ्यासह माझ्या घराण्यावर वैयक्तिक टीका केली. माझ्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना व मतदारांना हे पटलं नाही. विजयाची जागा असताना त्यांनी अशी वक्तव्य करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यामुळेच त्यांचा पराभव झाला हे नाकारता येणार नाही.

शिवाय त्यांनी माझ्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आपण साळुंके यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं. लोकसभेला मी प्रत्येक गावागावात जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. त्यामुळेच महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) यश आलं. प्रत्येक पक्षात मतभेद असतात, परंतु खालच्या पातळीवर बोलून टीका करणं पक्षाच्या आचारसंहितेत बसते का?

या विधानसभा निवडणुकीतही (Assembly Election) अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गावातील मताधिक्य घटले याची जबाबदारी कोण घेणार? माझी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा म्हणून ठराव घेतल्याचं माझ्या कानावर आलं आहे. परंतु मी सध्या काँग्रेस पक्षाला सोडणार नाही आणि सोडलेलं नाही परंतु अनेक पक्ष फिरून आलेले आम्हाला निष्ठावंताची भाषा शिकवत आहेत. पण खरे निष्ठावंत कोण आणि उपरे कोण हे येणारा काळच ठरवेल असंही निलंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT