Farmers Leader Asha Shinde Met NCP Leader Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics : शेकापच्या आशा शिंदे शरद पवारांना भेटल्या, चिखलीकरांची विधानसभेची वाटही बिकट ?

Jagdish Pansare

Nanded Political News : भाजपचे माजी खासदार व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांचे बंधू प्रताप पाटील चिखलीकर सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून हमखास विजयाची खात्री असताना पराभूत व्हावे लागले. आता लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून आपले पुनर्वसन करू पाहत असलेल्या चिखलीकरांची बहीण आशाताई शिंदे यांनी घेतलेल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे अजूनच अडचण झाली आहे.

आशाताई शिंदे यांनी आज (ता.3) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या राजकीय भेटीनंतर आशाताई शिंदे या राष्ट्रवादी पक्षाची `तुतारी` हाती घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी आशाताई शिंदे यांना काँग्रेस पक्षाकडून पक्ष प्रवेशाची आॅफर देण्यात आली होती.

मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रवेशाची तयारीही झाली होती. पण ऐनवेळी कौटुंबिक कारण देत आशाताई यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आशाताई शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रेवश करणार असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांच्या सोबत विविध विषयावर चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोहा-कंधार मतदार संघातील विषयावर पवारांशी चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले. तासभराच्या या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे देखील बोलले जाते. (Nanded) लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी असलेल्या आशाताई शिंदे या विधानसभा लढवण्यास इच्छूक आहेत.

एकीकडे आशाताई शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेत नवी राजकीय खेळी केली आहे. तर तिकडे त्यांचे बंधू यांनी लोकसभेतील पराभवानंतर लोहा-कंधारमधून पुन्हा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लोहा-कंधार मध्ये बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत पहायला मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. आता लोहा-कंधार मतदारसंघात हे बहीण-भाऊ ऐकमेकांच्या विरोधात उतरतात का? आशा शिंदे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट त्यांच्या पक्ष प्रवेशासाठीची ठरणार का? यावर लोहा-कंधार मतदारसंघाचे पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT