Sudhakar Shrangare | Shivaji Kalge Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha Exit Poll 2024 : लातूर मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये कांटे की टक्कर !

Sachin Waghmare

ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील काही दिगग्ज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडले असताना काँग्रेसने कमबॅक करीत लातूर लोकसभेच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली.

'पोल ऑफ पोल'ने वर्तवलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगेना आघाडी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोल्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे बाजी मारतील, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये (Bjp) कांटे की टक्कर झाली, त्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि कॉंग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात चुरशीची लढत झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर या दिगग्ज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचा फटका काँग्रेसला बसेल असे वाटत होते. मात्र, काँग्रेसने त्यांची कमतरता जाणवू न देता प्रचारात मोठी आघाडी घेतली.

लातूर मतदारसंघात कॉंग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेत लोकांचे मूलभूत प्रश्न ठासून मांडले. त्यातच एक सुशिक्षित, उच्च शिक्षित, सुस्वभावी उमेदवार म्हणून डॉ. काळगे यांची प्रतिमा प्रभावी ठरली. त्यामुळे प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या गोटात उत्साह तर भाजप नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कॉंग्रेसने सामाजिक समीकरण लक्षात घेऊन लिंगायत उमेदवार मैदानात उतरविल्याचाही फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

या माध्यमातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी बेरजेचे राजकारण केले. कारण नेहमीच भाजपला भक्कम साथ देणाऱ्या लिंगायत समाजाला डॉ. काळगे यांच्यासाठी फेरविचार करावा लागला, यात शंका नाही. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील लिंगायत समाजही डॉ. काळगे यांच्या बाजूने उभा राहिला.

डॉ. काळगे (Shivaji Kalge) यांचे गाव शिरुर अनंतपाळ तालुक्यात असल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघातून त्यांना भक्कम पाठबळ मिळाल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे यावेळी मोदी लाट फारशी जाणवली नाही. उलट मोदी सरकारबद्दल रोषच प्रकट झाला. त्याचाही फायदा कॉंग्रेस पक्षाला झाला.

दुसरकीकडे लातूर लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे मोठे नेटवर्क आहे. त्याचा फायदा भाजपला झाला अशी चर्चा आहे.

त्यामुळे या ठिकाणी काळगे व शृंगारे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये एक्झिट पोल्सना देखील येथील लढतीचा अंदाज स्पष्टपणे व्यक्त करता आला नाही. एकीकडे काळगे तर दुसरीकडे शृंगारे आघाडी घेतील असा मतदारांनाच बुचकळ्यात टाकणारा कल एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे.

SCROLL FOR NEXT