sudhakar shingare-Sambhajirao Patil Nilangekar
sudhakar shingare-Sambhajirao Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

शृंगारे साहेब...लोकसभेची पुढची उमेदवारी पुन्हा तुम्हालाच : निलंगेकरांंनी भरसभेत दिली ग्वाही

राम काळगे

निलंगा : लोकसभा निवडणुकीला आणखी कालावधी बाकी असला तरी काही उत्साही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांकडून उल्लेख होत आहे, त्यामुळे निलंगा येथील विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भरकार्यक्रमात शृंगारे साहेब... येत्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी तुम्हालाच आहे. चांगले काम करा, केंद्रात मंत्रीही म्हणून जाल, असा उल्लेख करून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, यामुळे सध्या तरी उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. (Sudhakar Sringare's candidature for the upcoming Lok Sabha elections again : Sambhajirao Patil Nilangekar)

निलंगा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण दोन दिवसांपासून सुरू असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनीधी उपस्थिती राहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारेही संत तुकाराम महाराज मंदीर सभागृह व ‘अटल वाॕक वे’ च्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. लोकसभा निवडणुका दूर असल्या तरी भारतीय जनता पक्षामध्ये अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना ‘खासदारकीचे’ स्वप्न पडू लागले आहे. काही पदाधिकाऱ्यांना, तर चक्क भावी खासदार म्हणून संबोधले जात आहे. ही बाब माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्याही कानावर पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सामान्यातले सामान्य कार्यकर्ते खासदार व आमदार झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुधाकर शृंगारे हे दोन लाख नव्वद हजार मतांनी विजयी झाले होते. म्हणून आतापासूनच अनेक कार्यकर्त्यांची नावे चर्चिली जात आहेत. निलंगा येथील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार सुधाकर शृंगारे यांनी कोणताही आचपेच न ठेवता बेधडक मनोगत व्यक्त केले. त्यामुळे उपस्थित निलंगेकरही भारावून गेले.

‘अटल वॉक वे’च्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, खासदार शृंगारे यांच्या पोटात काहीच राहत नाही. ते जे पोटात, तेच ओठात याप्रमाणे बोलतात. त्यांचे मन पाण्याप्रमाणे निखळ आहे, असा उल्लेख करून, ‘शृंगारेसाहेब... तुम्ही काळजी करू नका. लोकांची कामे करा. अशीच कामे करून जनतेचा आशीर्वाद घेत राहीलात तर पुन्हा एकदा आपण खासदार होणार आहात. कारण देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच होणार आहेत. तुम्ही मंत्री होणार आहात. यापुढील लोकसभा निवडणुकीलाही आपणच उमेदवार राहणार आहात. तुम्हालाच उमेदवारी आहे. असे म्हणत एकप्रकारे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. यामुळे उमेदवारीवरून भाजपामध्ये रंगत असलेल्या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.

विद्यमान खासदारांनाही पुढची उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र थेट माजी मंत्री पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनीच उमेदवारीबाबत वक्तव केल्याने खासदार शृंगारे हेही निश्चिंत झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT