नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला Sarkarnama
मराठवाडा

Sukhwinder Singh Badal: स्वत:च्या अंगावर वार घेत माजी उपमुख्यमंत्र्यांना वाचवलं, जीवाची बाजी लावणाऱ्या पीआय केंद्रेंच्या कामगिरीची बादल कुटुंबियांनी घेतली दखल

Nanded attack News : बादल कुटुंबीयांनी आज रुग्णालयात जाऊन संतोष केंद्रे यांची भेट घेतली. हात जोडत त्यांनी सुखबीरसिंग बादल यांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानले.

Jagdish Pansare

Nanded news : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माता साहिब देवाजी गुरुद्वारा परिसरात 13 ऑगस्ट 2026 रोजी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर कृपाणने हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक संतोष वैजनाथ केंद्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता हस्तक्षेप केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून बादल यांच्या आणि हल्लेखोरामध्ये अक्षरशः ‘मानवी ढाल’ बनून उभे राहिले.

या हल्ल्यात केंद्रे स्वतःही जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बादल कुटुंबीयांनी आज रुग्णालयात जाऊन संतोष केंद्रे यांची भेट घेतली. हात जोडत त्यांनी सुखबीरसिंग बादल यांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानले. त्यासोबतच आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छितो असे, सांगत आर्थिक मदत केल्याची माहिती आहे.

सुखबीरसिंग बादल हे पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह नांदेडमधील गुरुद्वारांना भेट देण्यासाठी आले होते. 13 ऑगस्ट रोजी माता साहिब देवाजी गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर ते पायऱ्यांवरून खाली येत असताना, तेथे सेवेदार म्हणून असलेल्या 62 वर्षीय जसपाल सिंह तेजा ऐडल याने लपवून ठेवलेली कृपाण बाहेर काढून बादल यांच्या दिशेने हल्ला केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

हल्लेखोराचा वार बादल यांनी प्रसंगावधान राखत वार चुकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्याच क्षणी सुरक्षा पथकातील निरीक्षक संतोष केंद्रे पुढे झेपावले. हल्लेखोराला आवरून त्याच्याकडील शस्त्र काढून घेण्याच्या प्रयत्नात केंद्रे यांच्या उजव्या हातालाही दुखापत झाली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

संतोष केंद्रेंचे धाडस!

सुरक्षा अधिकारी म्हणून केंद्रे यांनी त्या क्षणी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता बादल यांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी हल्लेखोर आणि बादल यांच्यामध्ये स्वतः उभे राहिले. हल्ला रोखण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष झुंज दिली. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. या काही सेकंदांच्या निर्णयामुळे बादल यांच्यावर आणखी गंभीर वार होण्यापासून बचाव झाला.

महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण पथकातील या अधिकाऱ्याच्या शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, केंद्रे यांनी या प्रसंगानंतर आपण केवळ आपले कर्तव्य बजावले, अशी नम्र भूमिका घेतली. हल्ल्यानंतर सुखबीरसिंग बादल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संतोष केंद्रे यांच्याप्रती विशेष कृतज्ञता व्यक्त केली. हरसिमरत कौर बादल यांनी 14 ऑगस्ट रोजी सार्वजनिकरित्या केंद्रे यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांनी केंद्रे यांनी मानवी ढालीसारखे बादल आणि हल्लेखोराच्यामध्ये उभे राहून स्वतःचा जीव धोक्यात घातला, असे सांगत त्यांच्या शौर्याला सलाम केला. बादल कुटुंब त्यांचे हे धाडस कधीही विसरणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

बादल कुटुंबीयांनी केंद्रे यांच्यासमोर कृतज्ञतेने नतमस्तक होत त्यांचे आभार मानले. केंद्रे यांच्या उपचारांचीही विचारपूस करण्यात आली. तसेच त्यांच्या धाडसाबद्दल विशेष रोख बक्षिसाची घोषणा देखील केली आहे. एकंदरीत, संतोष केंद्रे यांनी दाखवलेले धैर्य हे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि प्रसंगावधानाचे अत्यंत प्रभावी उदाहरण ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT