Sunil Mane, Suresh Birajdar News Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra politics : 'भाऊंनी' घातली 'दाजीं' ना भगवी टोपी ! भाजप-राष्ट्रवादीची मैत्री पक्की

अविनाश काळे

Umarga News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. सुरेश (दाजी) बिराजदार यांची निवड झाल्याने दाजींसोबत एकत्र काम केलेले मित्र व भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात असलेले सुनिल (भाऊ) माने यांनी बुधवारी (ता. १३) सत्कार केला, त्यात विशेष म्हणजे भगवी टोपी घातल्याने सत्काराची चर्चा होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांचा स्वतंत्र गट करून भाजप-शिवसेनेच्या (Shivsena) सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी सावध पावित्रा घेत राजीनामा दिला. हळूवारपणे त्यांनी स्थानिक राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटात जाण्याचे पसंत केले. भाजपने शिवसेना फोडून सत्तेत बस्तान बसवल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण घडवुन आणले. तीन पक्षाचे सरकार झाल्यापासुन स्थानिक पातळीवर अप्रत्यक्षपणे दुरावले गेलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुन्हा मनोमिलन होत असले तरी येणाऱ्या काळात ऐनवेळी बदलाने अंतर्गत धुसफूस होऊ शकते, अशी चर्चा आहे.

स्थानिक राजकारणात वाढतेय रंगत !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मानणारा मोठा वर्ग आहे, विशेषत, भूकंपग्रस्त भागातील नागरीक आणि शेतकऱ्यांची पवार यांच्याबद्दल आस्था आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून सुनिल माने यांची ओळख आहे. पक्षात सक्रिय काम करत, त्यांनी कर्तृत्वाने व्यवसाय, उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली. आमदार राणाजगजितसिंह पाटील २०१९ च्या दरम्यान भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्यापासून माने त्यांच्यासोबत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर बिराजदार यांच्याशी असलेले मैत्री त्यांनी कायम ठेवली.

भाऊसाहेब बिराजदार बॅंक, साखर कारखाना असो की शिक्षण संस्था या क्षेत्रात दोघे एकत्र काम करतात. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या "विलंबा"ने  भाजपसोबत आलेला योगायोग स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या मैत्रीचा आणि राजकारणात अप्रत्यक्ष एकमेकांना सहकार्य करण्याचा मार्ग तूर्त तरी मोकळा दिसतोय.

दरम्यान, बिराजदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धाराशिव लोकसभा मतदारांचे उमेदवार म्हणुनही त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, या मतदारसंघात भाजपची जोरदार तयारी असल्याने येणाऱ्या काळात काय होईल, हे सांगता येणार नाही. कदाचित दाजींना उमेदवारी मिळाली तर "भगव्या टोपी" च्या सत्कारकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढेल.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT