Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या निर्णयाला मावळवासियांनी तीव्र विरोध केला आहे. बारा वर्षानंतर राज्य सरकारने बंदी नुकतीच उठवली आहे. त्यामुळे संतप्त झालेली सर्वपक्षीय कृती समिती परवा (ता.१५) सकाळी वडगाव येथील तहसीलदार कचेरीवर मोर्चा नेऊन घेराव करणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय ही बंदी उठली म्हणून तिचे स्वागत करीत असताना मावळ तालुक्यात मात्र त्याविरुद्ध चित्र आहे. तेथील सर्वपक्षीयांना या कृतीचा निषेध केला असून विश्वासात न घेतल्याने ते जास्त संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन बुधवारी बैठक घेतली. त्यात ही स्थगितीच नाही, तर ही योजना सुद्धा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि आमदार अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सुनील शेळके यांच्या नेतृत्वात निघणार आहे. त्यात सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा मावळचे माजी भाजप (BJP) आमदार बाळा भेगडे यांनी ही बैठक संपल्यानंतर केले. मात्र, हे दोन्ही आमदार, खासदार हे मुंबईत बैठकीला गेलेले असल्याने आजच्या मावळातील पवना प्रश्नावरील बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ते शुक्रवारच्या मोर्च्यात सामील होणारा का याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कट्टर समर्थक स्थानिक लोकप्रतिनिधींना (खा. बारणे शिंदेचे, आ. शेळके पवारांचे) विश्वासात न घेता ही बंदी उठविण्यात आल्याने नजरचुकीने हा निर्णय झाला, तर नाही ना, अशी शंका भेगडे यांनी उपस्थित केली. तसेच तो अधिकारी पातळीवर झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तो झाल्याने मावळ तालुक्यावर मोठा अन्याय झाल्याने तेथील रहिवाशांत प्रचंड चीड निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच हा निर्णय घेताना सरकारने विश्वासात घेतले पाहिजे, मात्र त्याचे गांभीर्य आता त्यांच्या लक्षात आणून देऊ, असे ते म्हणाले. तसेच याबाबत कृती समिती जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, त्यानुसार पुढील दिशा ठरवू, असे भेगडेंनी स्पष्ट केले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.