Beed News : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं हादरला होता. या त्यांच्या हत्येला दीड वर्षे उलटल्यानंतर न्यायालयात खटला सुरू आहे. याप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 5 जण अटकेत आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. पण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच आंधळे हा बीडमध्ये आत्तापर्यंत तीनदा येऊन गेल्याचा आरोप केला आहे. यानंतर वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टानं जामीन फेटाळत मोठा झटका दिला होता. त्यानंतर आता बापाचा जामीन फेटाळल्यानंतर मुलानं एक खळबळ उडवणारी पोस्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. बीड जिल्हा न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन तसेच दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही कराडला धक्का दिला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर कराडच्या जामीन अर्जावर गुरुवारी (ता.26) सुनावणी झाली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुलगा सुशील कराडनं शुक्रवारी फेसबुक पोस्ट करत बीड जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. कराडचा मुलगा सुशील कराडनं आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार... अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड काय धक्कादायक माहिती पुढे आणणार का, किंवा बापावर निर्घृण हत्येचे आरोप होत असताना मुलगा नेमकं काय बोलणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. सुशील कराडची फेसबुक पोस्ट बीड जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
संतोष देशमुख प्रकरण किंवा महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणामुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं होतं. या दोन्ही गुन्ह्यात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रकरण लावून धरत भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड सह त्यांच्या गँगवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे वाल्मिक कराडचा मुलगा या दोन्ही प्रकरणात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
बीडमध्ये अत्यंत क्रूरपणे संपवलेल्या महादेव मुंडे प्रकरणात काही आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली होती. नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीला मिळाला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याच शक्यता आहे.
तसेच महादेव मुंडे यांच्या मुलाला अभ्यासिकेमध्ये जात असताना काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणातही सुशील कराडवरच संशय व्यक्त केला जात आहे. महादेव मुंडेंच्या पत्नीनं सुशील कराडवर आरोप करत संरक्षणाची मागणी केली होती, त्यानंतर आता वाल्मिक कराडच्या मुलाची पोस्ट व्हायरल होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.