

BJP-AIMIM News : नुकत्याच झालेल्या राज्यातील महापालिका निवडणुकी दरम्यान मुंब्राची निवडणूक चांगलीच गाजली. एमआयएमच्या नगरसेविका सहार शेख यांनी 'कैसा हराया' म्हणत संपूर्ण मुंब्रा मला हिरवा करायचा आहे, असे विधान केल्याने एकच खळबळ उडाली होती. या विधानानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे देखील आक्रमक झाले होते. दरम्यान, मुंब्राच्या एमआयएमच्या नगरसेविका सहार शेख यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एफआयआर दाखल करत कारवाईची मागणी केली होती.
इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात मुंबईत जाऊन आपल्या नगरसेविकेची पाठराखण करत केवळ मुंब्राच नाही तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करायचा आहे, असे विधान करत खळबळ उडवून दिली होती. सहार शेख या नगरसेविकेवर राजकीय दबाव आणत किरीट सोमय्या यांनी गुन्हा दाखल करण्यास पोलीसांना भाग पाडले होते.
यावर संतापलेल्या इम्तियाज जलील यांनी मुंबईतील आपल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. तसेच त्यांच्या कथित वादग्रस्त व्हिडिओचे मुंब्रात जाहीर प्रक्षेपण करण्याची धमकी दिली होती.
यामुळे खवळलेल्या किरीट सोमय्या यांनी आता इम्तियाज जलील यांना माफी मागा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याबद्दल दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करणारी नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. इम्तियाज जलील यांनी स्वत: या संदर्भात माहिती दिली आहे. सोमय्या यांनी पाठवलेल्या नोटिशीनुसार दोन राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये माफी मागावी आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याबद्दल दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना हे सर्व केवळ यासाठी की त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे, की मी त्यांना तोतला, तोतले, तोतल्या असे म्हटले होते. तसेच त्यांनी असा आरोप केला आहे की, मी त्यांच्या कथित रीलचे मुंब्राच्या मुख्य चौकात प्रक्षेपण करण्याची धमकी दिली होती.
किरीट सोमय्या तुम्ही भारतीय मुस्लिमांना परके आणि घुसखोर म्हणण्याचे निर्लज्ज धाडस करता. पण जर आम्हीही तुमच्या सारखेच किंबहुना तितकेच देशभक्त भारतीय आहोत. तुमच्या सारख्या लोकांच्या विचारांमुळे मदरसे बंद करण्याची मागणी केली जाते, कारण तुम्हाला वाटते की ते तरुणांच्या मनात दहशतवाद पेरतात.
ज्या ठिकाणी भारतीय लोकसंख्येत मुस्लिम बहुसंख्य आहेत त्या ठिकाणांना दहशतवाद्यांचे केंद्र असे संबोधले जाते. तुम्ही स्वतःच्या कबुलीनुसार मुंब्रा, मालेगाव, मानखुर्द यासारख्या ठिकाणांना लक्ष करता कारण तिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत. तुम्ही आमच्या अल्लाहच्या नावांचा आणि गुणांचा उपहास करता आणि त्यांना वाईट प्रकाशात दाखवता. तुम्ही मुस्लिम समुदायातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या जनप्रतिनिधींवर विविध खोटे आरोप करता. केवळ तुमचे सांप्रदायिक राजकारण भडकवण्यासाठी आणि पोलिस यंत्रणेंचा वापर करून त्यांना त्रास देण्यासाठी, असा पलटवार इम्तियाज यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
तुमच्या सर्वसाधारण आणि भडक वक्तव्यांमुळे तसेच सत्ताधारी भाजप सरकारच्या सरकारी यंत्रणेचा वापर करून तुम्ही भारतीय मुस्लिमांची प्रतिमा मलीन करता आणि या समुदायातील निरपराध लोकांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करता. तुमचा पक्ष मुस्लिमांना मुख्य प्रवाहातील भारतीयांपासून वेगळे वागवतो आणि शिक्षणातही त्यांना आरक्षण मिळू नये, असा युक्तिवाद करतो. जरी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशानमध्ये मुस्लिमांसाठी अशा आरक्षणाचे नितांत गरज अधोरेखित केली असली तरी.
आता माझे मित्र किरीट सोमय्या तुम्हाला 'तोतला' म्हटल्याबद्दल माझ्याकडून दहा कोटी रूपयांची भरपाई मिळवायची आहे का? की माझ्या समुदायातील लोकांवर होत असलेल्या छळाविरुद्ध मी उभा राहिलो म्हणून तुम्हाला मला घाबरावयाचे आहे. तुम्ही भारतीय निवडणूक आयोगात विधिपूर्वक नोंदणीकृत असलेल्या आमच्या एमआयएम पक्षाची तुलना जिनांच्या पाकिस्तान मधील मुस्लिम लीगशी करता. लोकांच्या सोयीसाठी मी 22 जानेवारी 2026 रोजीची त्यांची एक मुलाखत जोडत आहे. जी त्यांच्या मनातील विचार ते जवळजवळ दररोज कसे व्यक्त करतात हे स्पष्ट करते.
मुस्लिमांविषयी त्यांची भाषा, त्यांचा सूर आणि भावना हे आक्षेपार्ह नाहीत का? काहीच नसताना प्रकरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. रंग हिरवा असो की केशरी यासाठी पोलीसांनी नोटीस बजावणे हा गुन्हा ठरतो का? लोकांनी विचारले पाहिजे गुन्हा म्हणजे नेमकं काय? एखाद्या समुदायांवर वारंवार छळ करणे किंवा अशा छळाविरुद्ध आवाज उठवताना त्या खेळात सहभागी असलेल्या व्यक्तीला 'तोतला' म्हणणे निर्णय तुम्हीच घ्या, असेही इम्तियाज यांनी म्हटले आहे.
अल्लाहने सत्य बोलण्याची आणि योग्य कृती करण्याची मोठी ताकद दिली आहे. मला भारताच्या संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सोमय्या चला न्यायालयात भेटू या, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी किरीट सोमय्या यांच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.