Chhatrapati Sambhajinagar news, 12 Jun : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे यांचे पती तथा जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. वाळू माफियांच्या अंतर्गत वादात मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप बोरसे कुटुंबीयांनी केला आहे.
मात्र, पोलिसांनी सुरेश बोरसे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाळू माफियांशी झालेल्या वादा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा दावा आहे.
दुसरीकडे, गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाळू माफियांच्या हालचालींबाबत विचारपूस केल्यामुळे बोरसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बोरसे यांच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह असलेली ॲम्ब्युलन्स रस्त्यावर उभी करून आंदोलन सुरू केले.
संबंधित आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही तसेच रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या घटनेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या अत्याचाराचे उदाहरण असल्याचा आरोप केला.
दानवे म्हणाले, "सुरेश बोरसे हे एक चांगले शिक्षक होते. त्यांच्या परिसरात पोलीस आणि वाळू माफियांच्या गाड्या आल्या होत्या. त्यांनी केवळ पोलिसांना 'तुम्ही कुणाकडे आला आहात?' असा साधा प्रश्न विचारला. एवढ्याच कारणावरून पोलीस आणि वाळू माफियांनी त्यांना मारहाण केली," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
याप्रकरणी मुख्यमंत्री भूमिका मांडणार असल्याचे सांगत दानवे यांनी पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले. "मी या प्रकरणात भूमिका घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. नागरगोजे नावाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते, असे नोंदीतून स्पष्ट होते.
मग अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा कसा दाखल करण्यात आला? जिल्हा पोलीस अधीक्षक नेमके कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासाकडे आणि शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.