Parbhani Politics News : खासदार रामराव वडकुते यांच्याकडे दूरदृष्टी होती, म्हणून त्यांना आधी सुचले. मला जरा उशीराने सुचले अन् आता बंडू जाधव यांना सुचलं, अशी जोरदार फटकेबाजी करत माजी आमदार सुरेश वरपडूकर यांनी खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चेला हवा दिली. राज्य सभेवर भाजपकडून संधी मिळालेल्या खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार काल पक्षाच्या वतीने करण्यात आला.
भाजपाचे नेते सुरेश वरपडूकर यांनी या कार्यक्रमात आपल्या भाषणातून व्यासपीठावरील नेत्यांना चांगलेच चिमटे काढत टोले लगावले. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. एका मुस्लिम कार्यकर्त्याने थेट जाधव यांना फोन करून तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ नका, अशी साद घातली. याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती.
तत्पूर्वी, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अधिक हवा मिळाली होती. आॅपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असताना आता भाजपाच्या स्थानिक नेत्याने जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळकटी देण्याचे विधान केले. राज्यसभेतील भाजपाचे खासदार रामराव वडकुते यांच्या सत्कार समारंभात वरपूडकर यांची गाडी सुसाट सुटली होती.
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेले रामराव वडकुते यांना दिल्लीतील नेत्यांनी थेट राज्यसभेवर पाठवले. याचा दाखला देताना वडकुते हे दूरदृष्टीचे नेते निघाले. त्यांना फार आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सूचले. पण योग्यवेळी निर्णय घेतला आणि आज त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. आम्हाला जरा उशीरा सुचलं, आता बंडू जाधव यांनाही सुचलं आहे, असा टोला सुरेश वरपूडकर यांनी लगावला. त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.
रामराव वडकुते यांचे राजकीय गुरू अशी सुरेश वरपूडकर यांची ओळख आहे. वडकुते यांचा विधानपरिषद आमदारकीचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा घेतलेला निर्णय आज त्यांना राज्यसभेत घेऊन गेला. वडकुते यांच्यानंतर वरपुडकर यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले. आता खासदार जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर वरपूडकर यांनी त्यांची फिरकी घेत वरील वक्तव्य केले. वडकुतेंनी दूरदृष्टीने अगोदर निर्णय घेतला त्यांच्यानंतर आम्हाला सुचले व तेच आता बंडू जाधव यांना सुचत आहे असे ते म्हणाले. यावर संजय जाधव यांची प्रतिक्रिया आली नसली तरी ते लवकरच पक्ष सोडून महायुतीत सहभागी होणार, याला सुरेश वरपूडकर यांनी या विधानातून दुजोराच दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.