

Parbhani Politics News : खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना मुस्लिम कार्यकर्त्याने फोन करून शिंदे सेनेत न जाण्याची विनंती केली. या कथित व्हायरल आॅडिओ क्लीप नंतर संजय जाधव यांच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या आॅपरेशन टायगरच्या जाळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव अडकतात, की मग पक्ष फुटीनंतर दाखवलेल्या निष्ठेवर ठाम राहतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत परभणी जिल्ह्याचे महत्व मोठे आहे. या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत नाव याच परभणीने दिले. परभणीचा मतदार हा कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीतून दिसून आले आहे. वीस-पंचवीस वर्षात शिवसेनेने अनेकांना आमदार, खासदार केले. पण ज्या शहराने शिवसेनेला चिन्ह मिळवून दिले, त्याच परभणीमध्ये या पक्षाला गद्दारीची काळी किनारही आहे.
शिवसेना पक्षात फूट पडली तेव्हा खासदार संजय जाधव यांनी ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या पक्षनिष्ठेचे सर्वत्र कौतुक झाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना काही मुद्यावरून जाधव आणि ठाकरे यांच्यात मतभेद होते. ते त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले. पण पक्ष सोडण्याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही.
उद्धव ठाकरे यांनीही संजय जाधव यांना त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. मतदारांनीही त्यांना निवडून देत त्यांच्या पक्ष निष्ठेला मतदान रुपी आशीर्वाद दिले. परभणी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सगळी सूत्रं संजय जाधव यांच्या हाती आहेत. महापालिका निवडणुकीत जाधव यांनी काँग्रेससोबत आघाडी करत सत्ता आणली. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत महापौर, सभागृह नेता अशी महत्त्वाची पदं देत पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला.
खासदार संजय जाधव यांना पक्षात कोणी स्पर्धक नाही, आतापर्यंतच्या राजकारणात विरोधकांवर त्यांनी मात करण्यात यश मिळवले आहे. अशावेळी आॅपरेशन टायगरच आणि त्यात संजय जाधव हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चेने जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. परभणीला खासदारांच्या गद्दारीचा लागलेला शाप मिटणार की मग पुढे सुरूच राहणार? याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे.
यापूर्वीही खासदारांच्या पक्ष सोडून जाण्याने शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वला तडे गेले होते. पण यातून पक्ष वेळोवेळी सावरला, नव्या चेहऱ्याला संधी देत गेला आणि परभणीच्या मतदारांनी त्याला स्वीकारले. प्रा. अशोकराव देशमुख, ॲड. गणेशराव दुधगावकर, ॲड. तुकाराम रेंगे पाटील, ॲड. सुरेश जाधव या त्या काळातील खासदारांनी शिवसेनेची साथ सोडली आणि पुढे ते राजकारणातून संपले, अशीच त्यांची काहीशी अवस्था झाली.
या चार नेत्यांपैकी अशोकराव देशमुख यांचे निधन झाले आहे, तर उर्वरित नेतेही विविध राजकीय पक्षांमध्ये विखुरले गेले आहेत. ॲड. गणेशराव दुधगावकर राष्ट्रवादी काँग्रेस, तर ॲड. तुकाराम रेंगे पाटील काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. ॲड. सुरेश जाधव मात्र सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेत गेले. यापैकी सध्या किती जणांची ओळख टिकून आहे हा खरा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.