Suryakanta Patil Sarkarnama
मराठवाडा

Suryakanta Patil Left BJP : भाजपात उलथापालथ सुरू; रावसाहेब दानवे जाताच सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम

Nanded BJP News : पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेत सूर्यकांता पाटील यांना सहभागी करून घेतले जात नव्हते. महत्वाचे निर्णय घेतांना त्यांचे मत विचारात घेतले जात नव्हते.

Jagdish Pansare

Nanded Political News : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येऊ लागली आहे. आजच भाजपच्या कोअर कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्ष निरीक्षक माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

ही बैठक आटोपून दानवे लातूरला जात नाही तोच भाजपच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली.

पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेत सूर्यकांता पाटील Suryakanta Patil यांना सहभागी करून घेतले जात नव्हते. महत्वाचे निर्णय घेतांना त्यांचे मत विचारात घेतले जात नव्हते. त्यामुळे त्या नाराज होत्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील फारशा सक्रीय दिसल्या नाही. त्यावरही जिल्ह्यात चर्चा झाली होती.

आपल्या सदस्यपदाचा राजीनामा त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्याकडे पाठवला आहे. एक प्रत त्यांनी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे पाठवली आहे. 'मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगांव विधानसभा मतदारसंघ संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्यासोबत गेल्या 10 वर्षात खूप काही शिकता आले.

तालुक्यात बुथ कमीटी पर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता मी राजीनामा देत आहे', असे सूर्यकांता पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. त्यानंतर चव्हाण यांच्यावर टीका होत असतांना सूर्यकांता पाटील त्यांच्या समर्थनात मैदानात उतरल्या होत्या. राज्यसभेवर खासदारकी एवढीच अशोक चव्हाण यांची लायकी नाही. नांदेड लोकसभेतील पराभवाबद्दल चव्हाण यांना दोष देता येणार नाही, अशी पाठराखण पाटील यांनी केली होती.

आज भाजपने पाठवलेले पक्ष निरीक्षक रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांच्या आढावा बैठकीनंतरच सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थक म्हणून सूर्यकांता पाटील ओळखल्या जात होत्या.

डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री (ग्रामीण विकास) म्हणून काम पाहिले आहे. नांदेड, हिंगोलीमधून त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. भाजपमध्ये मोठ्या अपेक्षेने त्यांनी प्रवेश केला होता. पण पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याबद्दल त्यांनी अनेकदा खदखद व्यक्त केली होती.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT