Mla Sanjay Shirsat-Sushma Andhre News Sarkarnama
मराठवाडा

Sushama Andhare On Shirsat News : आमदार शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार..

Shivsena : अजित पवार यांना दादा म्हणलेले कधी टोचले नाही. कारण ते सज्जन व सभ्य संस्कृतीतील आहेत.

प्रवीण फुटके

Parli : आमदार संजय शिरसाट यांनी माझ्यावर टीका करतांना जी आर्वाच्य भाषा वापरली, माझी बदनामी केली या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी परळीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. याशिवाय परळी पोलिसांत देखील त्यांच्याविरुद्ध बदनामी केल्याप्रकरणी तक्रार देणार असल्याचे त्या म्हणाल्या.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दोन दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ती करत असतांना लफडेबाज असा उल्लेख केल्यामुळे शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Shivsena) छत्रपती संभाजीनगरात महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन केले, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज दिला आहे.

दरम्यान, परळी दौऱ्यावर असलेल्या अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केले. अंधारे म्हणाल्या, आमदार संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असून परळी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याबदल देखील तक्रार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. मी विरोधकांना प्रश्न विचारताना अत्यंत सन्मानाने बोलते, कारण माझ्यावर माझ्या कुटूंबाचे चांगले संस्कार झालेले आहेत.

सभ्य व सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने मी काम करते. आमदार संजय शिरसाटांना भाऊ म्हणलेले का टोचले ? आतापर्यंत अजित पवार यांना दादा म्हणलेले कधी टोचले नाही. कारण ते सज्जन व सभ्य संस्कृतीतील आहेत. ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहिती नाही त्या शिरसाटांना भाऊ म्हणलेले टोचले असेल. मुळात यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत गलिच्छ आहे.

मग अब्दुल सत्तार असोत, गुलाबराव पाटील असोत अथवा शिरसाट त्यांची भाषा संस्काराचा परिचय देते. त्यांच्याकडे (शिंदे गट) असणाऱ्या महिलांची भाषाही शिवराळ आहे. हरामखोर, बडवून काढीन अशा शब्दांचे प्रयोग त्या करतात. याचाच प्रभाव संजय शिरसाटांवर झाला असेल. यामुळे माझ्या पक्षाने विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र कुठेही पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मी कायद्याची अभ्यासक आहे, त्यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला चांगला कळतो. त्यामुळे शिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा.

राज्य सरकार शितल म्हात्रे प्रकरणात अत्यंत तत्परतेने मुलांना उचलते आणि गुन्हे दाखल करते. सरकार विरोधकाच्या महिलांची अब्रुच नसते,अशा पध्दतीने जर वागत असेल तर आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला साद घालायची आहे. मला विचारायचे आहे की, फक्त तुमच्याच पक्षातील महिलांची अब्रू महत्वाची व राज्यातील इतर महिलांची नाही का ? जर तुम्ही असा भेद करत नसाल तर मग समर्थक आमदारावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT