Ashok Chavan Nanded
Ashok Chavan Nanded Sarkarnama
मराठवाडा

मला शिव्या देणे हाच भाजपचा अजेंडा; आपण मात्र विकासकामांवर मत मागू

जगदीश पानसरे

नांदेड ः देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर असतांना तर मी विकासकामांसाठी निधी दिलाच, पण त्यांच्या निधनानंतर देखील मी इथे १०२ कोटींचा निधी दिला. जितेशला उमेदवारी देतांना सोनिया गांधी म्हणाल्या, जो व्यक्ती शेवटपर्यंत पक्षाशी प्रामाणिक राहिला त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे.

भाजपचा अजेंडा हा विकासाच नाही तर फक्त अशोक चव्हाणांना शिव्या देण्याचा आहे, आपण मात्र विकासाच्या अजेंड्यावर मत मागायची, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मला शिव्या दिल्याशिवाय भाजपच्या लोकांना झोपच येत नाही, पाण्यात देखील त्यांना मीच दिसतो, असा टोला देखील चव्हाण यांनी यावेळी लगावला.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली.

चव्हाण म्हणाले, या जिल्ह्यात आतापर्यंत कधी द्वेषाचे राजकारण केले जात नव्हते, काॅंग्रेसने ते कधी केले नाही. पण सध्या भाजपचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे अशोक चव्हाणांना शिव्या घालणे. मला शिव्या दिल्या म्हणजे आपल्याला मते मिळतील असा बहुदा भाजपवाल्यांचा समज झाला आहे.

पण तुम्ही मला जितक्या शिव्या द्याल, तितकी काॅंग्रेसची मते वाढतील. आपला अजेंडा विकासाचा आहे, शिव्यांचा नाही हे मतपेटीतून दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे आवाहन देखील चव्हाण यांनी यावेळी केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अत्यंत समन्वयाने महाराष्ट्राला पुढे नेत आहे. महाराष्ट्र पुढे जात असतांना मराठवाडा मागे राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.

समृद्धी महामार्गाला नांदेड, जालना, हिंगोली जोडण्याची मागणी केली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्याला मंजुरी देऊन निधी देखील दिला. मुख्यमंत्र्यांकडून काॅंग्रेस पक्षाला चांगले सहकार्य मिळत आहे, असेही चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या साबणेंना धडा शिकवा असे आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेतली. त्यामुळे जितेशचा विजय निश्चित आहे. रावसाहेब अंतापूरकरांपेक्षा दुपट्ट मतांनी त्याला विजयी करण्याची जबादारी तुमची आहे, बाकी सगळं माझ्यावर सोपवा, असेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT