Tanaji Sawant Vs Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant Vs Uddhav Thackeray : 'मी अयोग्य मंत्री असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही...' ; तानाजी सावंतांनी केला पलटवार!

Tanaji Sawant reaction on Uddhav Thackerays criticism : उद्धव ठाकरेंनी भूम येथील सभेत बोलताना केलेल्या टीकेनंतर तानाजी सावंत आक्रमक झाले आहेत.

Shital Waghmare

Dharashiv Political News : दोन दिवसापुर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौऱ्यावर येऊन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटायला सुरूवात झाली आहे.

सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करत मी वाघाला उमेदवारी दिली आहे, असा टोला लगावल्यानंतर त्याला सावंत यांच्या पुतण्याने पोस्टरबाजीतून प्रत्युत्तर दिले होते. आता ठाकरे यांच्या तुम्ही आरोग्य मंत्री नाही, तर अयोग्य मंत्री आहात, या टीकेचाही सावंत यांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला.

मी अयोग्य मंत्री असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री नव्हतात, तर मुर्ख मंत्री होतात, असा पलटवार सांवत यांनी केला आहे. ठाकरे यांच्या सभेनंतर आता जिल्ह्यात कलगितुरा रंगतांना दिसतो आहे. मी जर अयोग्य मंत्री म्हणून तुम्हाला वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेने त्यावेळेस एवढे आमदार निवडून देऊन चूक केली. त्यावेळेस 2019 ते 22 पर्यंतचे मूर्ख मंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री म्हणून नाही. मी जर अयोग्य मंत्री असेल तर महाराष्ट्राचे मूर्ख मंत्री तुम्ही होता, असे म्हणत सांवत यांनी ठाकरेंना उत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी भूम येथे झालेल्या जनसंवाद सभेत त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली होती. तानाजी सावंत यांच्यावर तो आरोग्य मंत्री नाही तर अयोग्य मंत्री आहे. मी मुख्यमंत्री असताना खेकड्याला मंत्री केलं नाही. याच खेकड्याने शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. पण या खेकड्याला वाघ माहीत नाही. खेकडा हा वाकडा वाकडा चालतो. या खेकड्याला तो वाकड्या हाताळतो. धरण फुटीची जबाबदारी खेकड्यावर झटकणारा काय कामाचा ? मात्र अशा माणसाला आपण उमेदवारी देऊन चूक केली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागत सावंत यांना डिवचले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, कर्माने मरणा-या माणसाला धर्माने मारण्याची गरज नाही. खेकड्याला मस्ती आहे. या खेकड्याला पुन्हा इकडे येऊ देणार नाही, असे म्हणत ठाकरे यांनी आव्हान दिले होते. ठाकरेंची ही टीका लागल्यामुळे सांवत सध्या तुटून पडले आहेत. दहिगाव येथील सिना कोळेगाव प्रकल्पाच्या पाहणी नंतर झालेल्या कार्यक्रमात सावंत यांनी उद्धव ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका करतांनाच काही गंभीर आरोपही केले.

तानाजी सावंत म्हणाले, 'तत्कालीन पक्षप्रमुख भूमच्या सभेत बोलले, अयोग्य मंत्री, आरोग्यमंत्री किती शिकला हे माहीत नाही तुला. कारण माझ्या लेखी तत्कालीन पक्षप्रमुखांची डिग्री दहावीच्या पुढची नाही आणि मी काय शिकलो हे शिवाजी विद्यापीठाला माहिती आहे. त्या वेबवर गेलो तर तानाजी सावंत यांच्या डिग्री येतील. तो रँकर होता की फेल झालेला होता हे तुम्हाला कळेल. पुणे विद्यापीठात गेल्यावर कळेल तानाजी सावंत काय शिकला आणि काय नाही, हे पण समजेल. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून पीएचडी छापून आणली का बोगस सर्टिफिकेट आहे हे ही तुला कळेल.'

डॉक्टरेट पदवी मला आंदण दिलेली नाही. त्याच्यासाठी मी घासली, अभ्यास केला तेव्हा या पदव्या मिळाल्या. कागदावरच्या डिगऱ्या नाही मिळवल्या, असा जोरदार प्रहार सावंत यांनी ठाकरेंवर केला. ज्या तानाजी सावंतने सातशे रुपये पगारावरती 10 वर्ष नोकरी केली. त्या तानाजी सावंतने आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही माझ्या शिक्षणाची पावती आहे. मला वेगळ्या कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे म्हणत सावंत यांनी आपला संताप व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT