Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. दोन वर्षापुर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाच्यावेळी राजपूत यांनी पक्षावर निष्ठा दाखवत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा पैकी एकमेव उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. अन्य पाच आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.
गेल्या दोन वर्षात सत्ताधारी शिवसेना आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी आपण त्यांच्यासोबत न गेल्याचा आपल्यावर सूड उगवल्याचा आरोप राजपूत यांनी अनेकवेळा केला होता. (Kannad) मतदारसंघात पुरेसा निधी दिला नाही, असे म्हणत राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतदारसंघातील कामांची यादी असलेली फाईल भिरकावली होती.
शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कन्नडमधून उदयसिंह राजपूत यांना निष्ठेचे फळ दुसऱ्यांदा उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे. पक्षाची मशाल घेऊन उदयसिंह राजपूत मैदानात उतरले असले तरी महायुतीकडून त्यांच्याविरोधात कोण असणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कन्नड मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. यासाठी कन्नडमध्ये ते वेगळ्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडीकडून फेरबदल केले जात आहेत. कन्नडची जागा जिंकण्यासाठी महायुतीतील शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
येत्या एक-दोन दिवसात महायुतीतील कोणता घटक पक्ष कन्नडमधून लढतो हे स्पष्ट होईल. विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) हे 2019 मध्ये कन्नडमधून निवडून आले. अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा त्यांनी 18 हजार 600 मतांनी पराभव केला होता.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे पराभव झाला होता. एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघात जाधव यांच्यावरील राग मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. उदयसिंह राजपूत यांनी 2004-2009 मध्ये अपक्ष तर 2014 ची विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. मात्र या तीनही वेळा राजपूत यांना लक्षवेधी मते घेऊन देखील यशाने हुलकावणी दिली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजपूत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली.
शिवसेनेतील बंडाच्यावेळी राजपूत यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्याचे फळ दुसऱ्यांदा उमेदवारीच्या स्वरुपात त्यांना मिळाले. शिवसेनेची मशाल ते मतदारसंघात पेटवत ठेवतात का? की महायुती कन्नडची जागा हिसकावून घेते? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.