Sambhajinagar Loksabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar Loksabha Constituency : संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार, ठाकरे गटाच्या नेत्यांनाही विश्वास...

Jagdish Pansare

Marathwada Political News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात झालेल्या दोन मोठ्या बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार? यावरही मोठा खल सुरू आहे. (Sambhajinagar Loksabha Constituency) मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गट, तर महायुतीत ही जागा भाजपच लढणार, असा दावा आणि विश्वास खुद्द ठाकरे गटाकडूनच केला जातोय.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना या संदर्भात विचारले असता संभाजीनगरची जागा शिंदे गटाला मिळणार नाही, इथून भाजपचाच उमेदवार असेल असे भाकीत केले आहे. परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनीही संभाजीनगरच्या जागेवर (BJP)भाजपचाच उमेदवार असेल असा दावा केला आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे स्थानिक नेते, मंत्री, आमदार ही जागा शिवसेनेची आहे आणि आम्हीच ती लढवणार असे सांगत असले तरी पडद्यामागे मात्र वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने एकत्रित ही निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी पराभूत झाले होते. (Marathwada) त्यामुळे ठाकरे गटाकडून आता त्यांना सहाव्यांदा पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ज्या जागा युतीमध्ये शिवसेनेने लढवल्या होत्या, त्या लोकसभा मतदारसंघांवर आता शिंदे गटानेही दावा केला आहे. पण यासाठी ते फारसे आग्रही नसल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे भाजपने मात्र शिवसेनेकडे असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, परभणी, धाराशिव या मतदारसंघामध्ये स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांचे एकमेव नाव समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून कराड यांनी लोकसभेची तयारी सुरू केली असून, नुकताच त्यांनी बागेश्वर धामचे मठाधिपती धिरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेचा मोठा कार्यक्रम शहरात घेतला होता.

लोकसभा लढवण्याची आपली इच्छा असल्याचे कराड यांनी जाहीरपणे सांगतिले होते. तर पक्षाने आदेश दिल्यामुळेच आपण कामाला लागलो आहोत, असे ते खासगीत सांगतात. आता ठाकरे गटाच्या नेत्यांनीही प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या विरोधात भाजपचाच उमेदवार असेल याला पुष्टी दिली आहे. येत्या महिनाभरात भाजपकडून कराड आणि शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खैरे यांच्या उमेदवारीबद्दल अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे. या दोघांनाही पक्षातून इतर कुणी स्पर्धक नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT