Arjun Khotkar-Raosaheb Danve News jalna Sarkarnama
मराठवाडा

मुख्यमंत्री म्हणाले, तुमचं कायं ते मिटवून टाका, अन् आम्ही एकमेकांना साखर भरवली..

माझ्याकडून कुठलीही अडचण नाही, पण तुम्ही खोतकरांना प्रत्यक्ष समोर बसवून सांगा, असे मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो. (Minister Raosaheb Danve)

तुषार पाटील

जालना : शिवसेना उपनेते अर्जून खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची घेतलेली भेट चांगलीच गाजत आहे. खोतकर ही भेट म्हणजे योगायोग असल्याचा दावा करत असले तरी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करणारे विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे. `सरकारनामा`शी बोलतांना दानवे यांनी खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाला दुजोरा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मला खोतकर यांच्यासोबत असलेले वाद मिटवून टाकण्याची विनंती केली. मी देखील त्यांच्या विनंतीला मान देत तयारी दाखवली. (Jalna) महाराष्ट्र सदनात खोतकर आणि मी समोरासमोर होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष खोतकर आणि मी आमच्यातील वाद आता मिटल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांना दिला. (Shivsena) त्यानंतर आम्ही एकमेकांना साखर भरवत शेवट गोड केल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

खोतकर-दानवे-शिंदे यांच्या दिल्लीत भेटीचे फोटो व्हायरल होताच राज्यात एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपुर्वी आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्यात बंडखोरांवर तुटून पडणारे खोतकर आज अचानक शिंदे गटात सहभागी झाल्याने अनेकांना धक्का बसला. खोतकर यांनी मात्र आपली ही भेट म्हणजे योगायोग असल्याचा दावा करत आपण अजूनही शिवसेनेतच असल्याचे माध्यमांना सांगत आहेत.

परंतु केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि खोतकरांचे जिल्ह्यातील राजकीय विरोधक असलेले रावसाहेब दानवे यांनीच खोतकरांच्या शिंदे गटातील सहभागाला दुजोरा दिला आहे. सरकारनामाशी बोलतांना दानवे म्हणाले, राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचा आज शपथविधी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आले होते. मला अचनाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि त्यांनी मला अर्जून खोतकर यांच्यासोबत असलेला वाद मिटवण्याची विनंती केली.

माझ्याकडून कुठलीही अडचण नाही, पण तुम्ही खोतकरांना प्रत्यक्ष समोर बसवून सांगा, असे मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो. त्यांनी मला महाराष्ट्र सदनात बोलावले, तेव्हा खोतकर आधीच तिथे बसलेले होते. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोघांनाही तुमच्यात काय असतील ते वाद मिटवून एकत्र काम करण्यास सांगितले. तेव्हा माझ्याकडून काही अडचण नाही, मी सगळे विसरून खोतकरांसोबत काम करायला तयार असल्याचे सांगितले.

मग मुख्यमंत्र्यांनी देखील खोतकरांना झालेगेल विसरून जा आणि एकत्रित काम करा, असा आदेश दिला. खोतकरांनीही तयारी दर्शवली आणि मग आम्ही एकमेकांना साखर भरवत शेवट गोड केला. दानवे यांच्या या दाव्यानंतर खोतकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT