Jaibhavani Sugar Factory News
Jaibhavani Sugar Factory News Sarkarnama
मराठवाडा

Jaibhavani Sugar Factory : राष्ट्रवादीच्या पंडितांनी 'जयभवानी' बिनविरोध काढला; भाजप आमदार अन् शिवसेनेच्या पंडितांना पॅनलही टाकता नाही आला

Dattatrya Deshmukh

Jaibhavani Cooperative Sugar Factory Election Beed : गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण पवार व शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी एकत्र येऊनही त्यांच्या आघाडीच्या उमेदवाराच्या अनामती जप्त झाल्या होत्या. बाजार समिती निवडणुक एकतर्फी जिंकल्यानंतर आता जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुकही राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित (Amar Singh Pandit) यांनी बिनविरोध काढण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पवार व पंडित यांना पॅनलही उभा करता आला नाही.

मंगळवारी (ता. २३) गढी (ता. गेवराई) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे निवडणुक बिनविरोध झाली. सभासद व शेतकर्‍यांच्या विश्वासाला कायम पात्र राहील असा विश्वास यावेळी अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला.

जयभवानी सहकारी साखर कारखाना गेवराई तालुक्याची आर्थिक वाहीनी म्हणून ओळखला जातो. मागच्या वर्षी कारखान्यात नवीन यंत्रणा बसवून कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. यंदा कारखान्याने पाच लाख मेट्रीक टनांहून अधिक ऊस गाळप केले.

दरम्यान, गेवराई मतदार संघातील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व पणन संस्थांवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व आहे. बाजार समितीमधील अनेक वर्षांपासूनच्या अमरसिंह पंडित यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण पवार व शिवसेनेचे (ठाकर गट) माजी मंत्री बदामराव पंडित एकत्र आले होते.

तरीही अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने विरोधी गटाच्या उमेदवारांच्या अनामती जप्त करत एकतर्फी विजय मिळविला आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर देखील पवार व पंडित सातत्याने टिका करत असल्याने या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ते पॅनल उभा करतील, असे अपेक्षीत होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेटच्या दिवसापर्यंत एकही अर्ज न आल्याने सत्ताधारी गटाचे चेरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक अखेर बिनविरोध झाली.

या बाबत औपचारिक घोषणा ता. 9 जुनला होणार आहे. दरम्यान, एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संचालक मंडळात माजी आमदार अमरसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, नारायण नवले, गणपत नाटकर, साहेबराव चव्हाण, शंकर तौर, जगन्नाथ शिंदे, श्रीराम आरगडे, आप्पासाहेब गव्हाणे, कुमारराव ढाकणे, राजेंद्र वारंगे, संभाजी पवळ, नंदकुमार गोरडे, डॉ. विजयकुमार घाडगे, रहेमतुल्ला पठाण, बाबुराव काकडे, भिमराव मोरे, शकुंतला दातखीळ, संध्या मराठे, जगन पाटील काळे, रावसाहेब देशमुख यांचा समावेश असेल.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हा उप निबंधक समृत जाधव तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक कदम आणि रामचंद्र ठोसर काम पहात आहेत. बिनविरोध निवडूण आलेल्या संचालकांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई संपर्क कार्यालयात तोफांची सलामी देवुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) समर्थकांनी विजयी घोषणा देत आनंद व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT