औरंगाबाद : वेदांता फाॅक्सकाॅन हा तब्बल पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकारने याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले आहे, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने वेळेत कंपनीला सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील प्रकल्प जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे सांगत हात झटकले.
दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलतांना ही प्रक्रिया काही दोन महिन्यातली नाही, अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात योग्य पावले उचलली नाही, म्हणून वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. (Maharashtra) आताच्या सरकारचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले. दानवे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात नवे उद्योग तर आले नाहीच, पण जे जुने उद्योग होते ते देखील शेजारच्या राज्यांमध्ये गेले.
वेदांताच्या बाबतीत सांगायचे झाले, तर जमीन हस्तांतरणाचा विषय हा काही गेल्या दोन महिन्यातला नाही. ती मोठी प्रक्रिया असते, महाविकास आघाडी सरकारने या कंपनीला मुलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्या असत्या तर हा प्रकल्प गुजरातला गेला नसता. महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा केल्यानंतर संबंधित कंपनीने गुजरात सरकारशी बोलणी सुरू केली असेल.
कारण कोणत्याही उद्योगाला आपला प्रकल्प लवकर सुरू व्हावा, असे वाटत असते. कारण उशीर झाला तर त्यातून संबंधित कंपनीचे नुकसान होत असते. महाराष्ट्र सरकारने वेदांता प्रकल्पासाठी जागा, वीज, पाणी व अन्य सवलतींच्या बाबतीत वेळेत निर्णय घेतले नाही, म्हणूनच हा उद्योग गुजरातला गेल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला.
आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्राकडून नेहमीच महाराष्ट्र तोडणार अशी भाषा केली जाते. पण महाराष्ट्र तोडणारा अजून जन्माला आलेला नाही आणि कोणीही तसे प्रयत्न करत नाहीये, असा दावा देखील दानवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.