Aurangabad Political News
Aurangabad Political News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : नाव गेले, चिन्ह गेले, ठाकरे गटाचे हे नेते काय करणार ?

Jagdish Pansare

Aurangabad : निवडणूक आयोगाच्या निकालाने शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह आता अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. हा ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का आहे, याचे दुरगामी परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होणार आहे. गेल्या २५-३० वर्षापासून औरंगाबाद हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जात होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिला हादरा या गडाला बसला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी केलेल्या बंडाने हा गड पुर्णपणे उद्धवस्त झाला.

जिल्ह्यातील पाच आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतरही स्थानिक नेत्यांनी सामान्य शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना रोखले. एवढेच नाही तर (Aditya Thackeray) आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेतून त्यांनी जिल्ह्यातील शिंदे गटाला जोरदार टक्करही दिली. (Aurangabad) पण खरी शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा ? या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील लढ्याने पक्षात राहिलेल्या शिवसैनिकांची द्विधामनस्थिती होती. कालच्या निकालाने त्यांचे खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची उत्सूकता देखील राहिलेली नाही, त्यामुळे द्विधामनस्थितीत असलेल्यांना आपल्याकडे ओढण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी, शिवसैनिक गळाला लागले, तर मात्र उद्धव ठाकरे गटाच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकी, जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने आपले राजकीय भविष्य कुठे उज्वल राहिल याचा विचार सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी केल्याशिवाय राहणार नाही.

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे निवडणूक आयोगाच्या निकालाने दाखवून दिले. ठाकरे गट याला लोकशाहीचा गळा घोटला म्हणू द्या, की देशात बेबंदशाही सुरू आहे, असे म्हणू द्या, पण याने वस्तुस्थिती काही बदलणार नाही. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात ठाकरे गटाला जिल्ह्यात आणखी काही धक्के पचवावे लागतील असे दिसते. शिंदे बंडाला बळी न पडलेले कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे शिवसेनेत गेल्यानंतर पहिल्यांदा आमदार झाले. यापुर्वी राष्ट्रवादी व अपक्ष म्हणून त्यांनी तीनवेळा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नव्हते.

शिवसेनेने त्यांना आमदार केले, त्यामुळे यांची जाण ठेवून ते थांबले. त्याबद्दल त्यांना मतदारसंघात सहानुभूती देखील मिळाली. त्यामुळे आता लगेच कुठलाही निर्णय घेवून ते ही सहानुभूती गमावणार नाहीत. उलट एकनिष्ठ राहिल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कन्नडमधून तेच उमेदवार राहतील आणि उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाला सामान्याची जी सहानुभूती मिळेल त्यात ते दुसऱ्यांदा आमदार होवू शकतील. त्यामुळे राजपूत शिंदेकडे जाण्याची घाई करणार नाहीत, असे बोलले जाते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू बनले आहेत. या विश्वासातूनच त्यांना आधी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदारकी आणि महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यामुळे त्यांचे पक्षात वजन वाढले आणि जिल्ह्यातील अंतर्गत विरोधही मावळला. त्यामुळे जिल्ह्याची सगळी सुत्र त्यांच्या हाती आली आहेत. शिवाय दीड वर्ष तेच विरोधी पक्षनेता म्हणून राहणार आहेत.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाची सगळी यंत्रणा या निमित्ताने त्यांच्या हातात येणार आहे. त्यामुळे ठाकरेंची साथ दानवे कदापीही सोडणार नाहीत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे अडगळीत पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा मातोश्रीवर खैरेंना मानाचे स्थान मिळाले. एवढेच नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून पुन्हा एकदा खैरेंना संधी दिली जाणार आहे.

ही संधी खैरे दवडवू इच्छित नाही. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाचे व्हायचे ते नुकसान झालेले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. अर्थात छोटे-मोठे पदाधिकारी, शिवसैनिक शिंदे गटाकडे आकृष्ट होवू शकतात, त्यामागे महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका हे कारण असणार आहे. नेते, आमदार मात्र ठाकरेंची साथ सोडणार नाहीत, असेच सध्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT