Mla Lanke-Patil- Andhare News, Beed
Mla Lanke-Patil- Andhare News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra : एकेकाचा हंगाम ; निलेश लंके, शहाजी पाटलानंतर आता सुषमा अंधारे..

दत्ता देशमुख

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणाला वक्तृत्व कलाकारांची मोठी देणं आहे. आक्रमक भाषणे, विनोदी भाषणे, सुसंस्कृत भाषणे, आरोपांच्या फैरी आणि विरोधकांच्या नकलांची दिग्गजांची भाषणे व त्यांचे संवाद नेहमीच गाजले आहेत. अलिकडे प्रगत तंत्रज्ञान व सोशल मिडीयामुळे भाषणे व संवादाच्या ऑडीओ आणि व्हिडीओ क्लिप्सचा प्रसार होण्यास मोठी मदत झाली.

दिग्गज नेत्यांच्या भाषणाच्या व पत्रकार परिषदांच्या क्लिप्स व्हायरल करणारी त्यांची यंत्रणा सक्षम असते. मात्र, मागच्या अडीच - तीन वर्षांत दुसऱ्या फळीतील व सामान्य कुटूंबातील निलेश लंकेनंतर (Mla Nilesh Lanke) काही काळ गाजविला तो शहाजीबापू पाटील यांनी. (Beed) आता ही जागा घेतली आहे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांनी.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल ठाकरी भाषण, दिवंगत विलासराव देशमुख यांचे विनोदी भाषण आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आक्रमक भाषणाच्या तसेच या नेत्यांच्या संवादाबाबतच्या क्लिप्स आजही सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.

कालानुरुप संदर्भाने या क्लिप्स पाहणाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची मंडळी असते. सध्याच्या राजकारणातील विविध पक्षांमध्ये अनेक दिग्गजांची भाषणे उपस्थितांना खिळवून ठेवतात. याची भलीमोठी यादी सांगता येईल. या मंडळींची व्यक्तीगत यंत्रणा व त्यांच्या पक्षाच्या मंडळींकडून भाषणे विविध माध्यमांवर व्हायरलही केली जातात.

काही मंडळींना केवळ वक्तृत्वाच्या जोरावर संवैधानिक पदे मिळाल्याची उदाहरणेही महाराष्ट्राने पाहिली आहेत. पण, अलिकडच्या अडीच - तीन वर्षांचा कालखंड पाहिला तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे) आमदार शहाजी पाटील व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषण व संवादाच्या जोरावर सोशल मिडीया आणि मिडीयाच्या डिजीटल प्लॅटफॉर्मचा मोठा स्पेस घेतल्याचे दिसते. विशेष म्हणजे वरिल तिघे नेते आपल्या भाषणांमुळे ट्रोल झाले नाहीत हे विशेष.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि काही काळानेच कोविड विषाणू संसर्गाची लाट आली. विविध माध्यमांतून उपाय योजना आणि उपचाराचे प्रयत्न होत होते. याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार लंके यांनी लोकसहभागातून भव्य कोविड केअर सेंटर उभारले. स्वत: रुग्णांची काळजी, कोविड सेंटरमध्येच मुक्काम यामुळे ते भलतेच चर्चेत आले. सुरुवातीला त्यांच्या मुलाखती व नंतर भाषणांत त्यांचा अस्सल ग्रामीण बाज पाहून त्यांची चांगलीच क्रेझ झाली. पुढच्या काळात त्यांना विविध ठिकाणी भाषणांसाठीही बोलविले जाऊ लागले.

यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेतील मोठा गट फुटून गुवाहाटीला पोचला. यावेळी सांगोलाचे आमदार शहाजी पाटील यांना एका समर्थकाने फोन केला आणि `काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ती हाटील, सगळ ओक्के मध्ये हाय`..हा संवाद भलताच गाजला. त्यामुळे शहाजी पाटील चांगलेच चर्चेत आले. त्यांच्या संवादाच्या बडे नेतेही नकला करु लागले. सोशल मिडीयावर अनेक दिवस शहाजी पाटील व त्यांचे संवाद गाजत होते. त्यामुळे त्यांना राज्याच्या विविध भागांत भाषणासाठी आमंत्रणेही येत होती.

यानंतर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब) उलथापालथीमुळे मोठा स्पेस निर्माण झाला होता. सुषमा अंधारे यांचे वक्तृत्व तसे सुरुवातीपासूनच आक्रम आहे. मात्र, शिवसेनेतील स्पेस आणि अंधारेंची एंट्री याचा असा संगम जुळलाय कि त्यांनी शिवसेनेतल्या स्पेस बरोबर सोशल मिडीया आणि मिडीयाच्या सोशल प्लॅटफॉर्मवरील स्पेसमध्येही मोठी जागा घेतली आहे. पक्षासाठी त्यांच्या सध्या सर्वाधिक पत्रकार परिषदा आणि विविध ठिकाणी भाषणांना त्यांना पुढची जागा मिळत आहे.

दरम्यान, त्यांच्यापुर्वी शिवसेनेतील उलथापलथीनंतर काही काळ खासदार संजय राऊत चांगलेच चर्चेत असत. तर, याच काळात शहाजी पाटील यांच्या काय तो डोंगर या संवादाला एक शब्द जोडून माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी एका भाषणात केलेला संवादही काही काळ चर्चेत होता. मात्र, त्यानंतर त्यांनीच वाट बदलल्याने त्या टिकेच्या धनी ठरल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT