Beed District Cooperative Bank  Sarkarnama
मराठवाडा

Beed District Cooperative Bank : बीड जिल्हा बँकेच्या कर्ज मागणीच्या प्रस्तावाकडे सरकारचा कानाडोळा ?

Datta Deshmukh

Beed News: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारचा असंवेदनशिलपणा दिसून आला आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टीच्या सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई वर्षभरानंतरही सरकारने संपूर्ण दिलेली नाही.

आता शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज प्रस्तावावरही सरकार दरबारी धुळ साचली आहे. जिल्हा कायम दुष्काळी असून अनेकदा अतिवृष्टी, अवकाळी पावसाचाही फटका शेतकऱ्यांना बसतो. मात्र, जाहीर केलेली मदत कधीच शेतकऱ्यांच्या हाती लवकर पडत नाही.

मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. साधारण पाच लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला. शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला खरा.

मात्र, यातील सततच्या पावसामुळे नुकसानीच्या ४०० कोटी रुपयांपैकी २१० कोटी रुपये सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिले नाहीत. शेतकऱ्यांबाबत कायम वक्रदृष्टी असलेल्या सरकारने शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या तीनशे कोटी रुपये कर्ज मागणीच्या प्रस्तावाकडेही सपशेल कानाडोळा केला आहे.

२०१२ पासून बँकेची आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर बँकेचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर थंडावले. बँकेचे ८१५ कोटी रुपये कर्ज असून यातील २३२ कोटी रुपये कर्ज चालू बाकीत आहे, तर उर्वरित कर्ज थकीत आहे.

शेतकऱ्यांकडे बँकेचे ६६३ कोटी रुपये कर्ज असून संस्थांकडे १२७ कोटी रुपये कर्ज आहे. दरम्यान, यापूर्वी थकीत कर्जदारांवर गुन्ह्यांमुळे बँक चांगलीच गाजली. मात्र, यामुळे कर्जवसूलीवरही मर्यादा आल्या. याचा परिणाम बँकेचे अर्थचक्र थांबले आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही कर्जाच्या बहुतांशी योजना बंद आहेत.

दरम्यान, जिल्हा बँकेवर सध्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, विशेष लेखा परिक्षक बी.यु.भोसले, सहाय्यक निबंधक अशोक कदम, अ‍ॅड.अशोक कवडे आदींचे प्रशासकीय मंडळ आहे.

या मंडळाने जिल्हा बँकेसाठी तीनशे कोटी रुपये कर्ज मागणीचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेला सादर केला आहे. राज्य सहकारी बँकेवर देखील प्रशासक मंडळ आहे. मात्र, तीन महिने होऊनही सरकारकडून या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय़ झालेला नाही.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT