Nanded Political News Sarkarnama
मराठवाडा

Nanded AIMIM Politics : नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या एमआयएमला जिल्ह्यात घरघर ...

Laxmikant Mule

Marathwada Political News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी नांदेडचा मार्ग निवडला. याच मार्गे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दाखल झालेल्या हैदराबादच्या एमआयएम (AIMIM News) पक्षाला नांदेड जिल्ह्यात पहिल्याच झटक्यात मोठे यश मिळाले होते. या पक्षाचा विस्तार राज्यात आणि त्यानंतर देशात झाला तोही नांदेडमधूनच. पण आज याच नांदेड जिल्ह्यात एमआयएमला घरघर लागल्याचे चित्र आहे.

नांदेडमध्ये (Nanded) पाय ठेवताच एमआयएमला नांदेड- वाघळा महानगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात एमआयएमचे अकरा नगरसेवक विजयी झाले होते. (Marathwada) काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात एमआयएमने दिलेली ही धडक प्रस्थापित पक्षांना विशेषतः काॅंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात होता. जिल्ह्यातील काॅंग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या अशोक चव्हाण यांनी एमआयएमचा भविष्यातील धोका ओळखला आणि त्यांना रोखण्याचे प्रयत्न तेव्हापासूनच सुरू केले होते.

नांदेड महापालिकेत एमआयएमला मिळालेल्या यशाची तेव्हा राज्यभर चर्चा झाली. या विजयाचे टाॅनिक घेत पक्षाने संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले. (AIMIM) एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीने ओवेसींनी आपल्या स्वभावाला साजेशा सभा घेत नांदेड जिल्ह्यात मोठी हवा निर्माण केली. मुस्लिम तरुणांना ओवेसींचा आक्रमक पवित्रा भावला आणि काॅंग्रेसच्या व्हाेट बॅंकेत मोठी फूट पडायला सुरुवात झाली.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मिळणाऱ्या मतांचा टक्का वाढत गेला. आधी छत्रपती संभाजीनगरच्या मध्य विधानसभेत आणि त्यानंतर २०१९ मध्ये थेट लोकसभा जिंकत एमआयएमने देशपातळीवर आपली दखल घ्यायला भाग पाडले. नांदेडमधून मराठवाड्यात जम बसवण्यास सुरुवात केलेल्या एमआयएमला नांदेडमध्ये मात्र गळती लागायला सुरुवात झाली. शहरात पक्षाचा जनाधार कमी होत असून, सध्या महापालिकेत एमआयएमचा एकही नगरसेवक नाही.

२०१२ च्या महापालिका निवडणुकीत जे अकरा नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी नऊ जणांनी पतंगाची साथ सोडली आणि काॅंग्रेसचा हात हाती घेतला. नगरसेवकांप्रमाणेच एमआयएमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत काॅंग्रेसमध्ये जाणे पसंत केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित एमआयएममुळे बिघडले होते.

एमआयएमच्या उमेदवाराने या मतदारसंघात ४२ हजार मते घेतली होती. त्यामुळे माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा पराभव झाला व शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर निवडून आले. एमआयएमचा प्रभाव आता ओसरला असल्याने येणाऱ्या महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात एमआयएमचा गेल्या दहा वर्षांत बराच विस्तार झाला. मुस्लिमबहुल भागात जनाधार वाढला खरा पण नगरसेवकांमध्ये पडलेली फूट, पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून जाणे, याचा परिणाम पक्षाची ताकद कमी होण्यावर झाला.

शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एमआयएमचा धोका वेळीच ओळखत त्यांचे पंख छाटण्याचे काम केले. एमआयएमचा सर्वाधिक फटका बसला तो काॅंग्रेसला. त्यामुळे एमआयएममध्ये फूट पाडून त्यांच्याकडे वळलेली काॅंग्रेसची पारंपरिक व्हाेट बॅंक खेचण्यात चव्हाण यांना काही प्रमाणात यश आले आहे. शिवाय एमआयएम-वंचित बहुजन आघाडी तुटल्यामुळे ओवेसी-इम्तियाज या जोडगाेळीचा राज्यातील प्रभावही काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT