Parli Assembly Constituency 2024 Sarkarnama
मराठवाडा

Parli Assembly Constituency 2024 : परळी विधानसभा मतदारसंघात 44 वर्षानंतर पहिल्यांदा भाजपचे कमळ नसणार!

Jagdish Pansare

प्रविण फुटके

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या दीड-दोन वर्षात राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडल्या त्यातून विधानसभेच्या अनेक मतदारंसघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यापैकीच एक म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये वर्षभरापुर्वी अजित पवार व त्यांच्या समर्थकांची एन्ट्री झाली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार समर्थक आमदारांसह महायुतीचा भाग बनले.

या सरकारमध्ये (Parli) परळीचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाची लाॅटरी लागली. राज्याचे कृषीमंत्री म्हणून ते जबाबादारी पार पाडत आहेत. 2019 मध्ये त्यांनी आपल्या बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. 2024 मध्ये ही जागा विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने या पक्षाकडेच जाणार हे निश्चित आहे. शिवाय लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महायुती असल्याने परळीत यंदा भाजपचा उमेदवार रिंगणात असणार नाही.

या बदलत्या समीकरणांमुळे तब्बल 44 वर्षांनंतर परळी मतदारसंघातून भाजपचे कमळ चिन्ह गायब असणार आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच परळीची निवडणूक कमळ चिन्हाशिवाय होणार आहे. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे जनता पार्टी तर्फे नांगरधारी शेतकरी या चिन्हावर निवडणूक लढले. पुढे 80 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे कमळ या चिन्हावर लढले व विजयी झाले. तेव्हापासून 2009 मध्ये रेणापूर विधानसभा विसर्जित होईपर्यंत व पुढे परळी विधानसभेतील 2019 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह प्रत्येक निवडणुकीत मैदानात होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पहायला मिळणार नाही. परळी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये झाली. पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघात 1980 मध्ये गोपीनाथ मुंडे कमळ या चिन्हावर विजयी झाले. (BJP) 85 मध्ये पंडितराव दौंड यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 1990 पासून 2004 पर्यंत सलग चार वेळा गोपीनाथ मुंडे भाजपतर्फे कमळ चिन्हावर निवडून आले. 2009 मध्ये परळी मतदार संघाची निर्मिती झाली. तेव्हापासून ते 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीपर्यंत पंकजा मुंडे यांनी भाजपची ही जागा राखली.

2019 मध्ये मात्र इथे बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत झाली आणि त्यात धनंजय मुंडे यांची सरशी होऊन ते विजयी झाले. आतापर्यंतच्या नऊ विधानसभा निवडणुकीत कमळ हे चिन्ह मतदारांसमोर होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र महायुती आणि त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला परळी मतदारसंघ जाणार असल्याने इथे कमळ चिन्ह असणार नाही. धनंजय मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे शरद पवार यांच्या रडारवर असलेल्या नेत्यात धनंजय मुंडे यांचे नाव अग्रस्थानी आहे.

परळी मतदारसंघातील अनेक नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सुरू केले आहेत. लोकसभेचा निकाल महायुती विरोधात लागल्याने शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. महायुतीत आल्याने धनंजय मुंडे यांचा पारंपरिक मतदार असलेला मराठा, मुस्लिम व मागासवर्गीय नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे आमदार झाल्याने त्यांच्या भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कितपत मनातून धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करतील ? हा प्रश्न आहे.

जरांगे पाटील यांचा प्रभाव परळी मतदारसंघात छुपा परंतु मोठ्या प्रमाणात असल्याचे वारंवार जाणवत आहे. मागील 45 वर्षांपासून मतदारसंघावरचे प्रभुत्व मुंडे घराणे कशा प्रकारे टिकवणार ? हे पाहण्यासाठी परळी बरोबरच महाराष्ट्रातील जनता उत्सूक आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून राजाभाऊ फड, सुनील गुट्टे, फुलचंद कराड, अॅड. माधव जाधव तर काँग्रेस कडून राजेसाहेब देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT