Pune News: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढील दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय त्यातील इच्छुकांना पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. या यादीमध्ये आपलं नाव यावं यासाठी हे इच्छुक सातत्याने आपल्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.
भाजपच्या नेतृत्वाकडून देखील पुढील 48 तासात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या यादीमध्ये पुण्यातील देखील काही विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.
पहिल्या यादीमध्ये कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जुन्या आणि नव्यांचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचा चेहरा बदलण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
पुणे (Pune) शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला येतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या मतदारसंघांमध्ये शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत तर कसबा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागला होत.
एखाद दुसरा सोडला तर सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोध असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक विरोध हा खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या काही हजार मतांनी हा मतदारसंघ भाजपने राखला होता. त्यामुळे यंदा भाजप नेतृत्व या ठिकाणी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथे देखील मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराची पिछेहाट झाल्याची देखील पाहायला मिळालं. त्यामुळे इथे देखील भाजप विविध पर्यायांवर विचार करत असल्याचं बोललं जात आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. असे असताना देखील मागील पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव भाजप नेतृत्वाच्या चांगली जिव्हारी लागला होतं. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाबाबत भाजपकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.
या ठिकाणी असलेल्या उपलब्ध पर्यायांचा आणि जातीय समीकरणांचा विचार करून भाजपकडून चेहरा निवडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी भाजप उमेदवार म्हणून एक वेगळा चेहरा समोर घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजप तीन नवे आणि तीन जुने चेहरे देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.