Imtiyaz jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Nanded Incident : हे मृत्यू नसून खून आहेत; डीन, वैद्यकीय संचालक आणि मंत्र्यांवरही गुन्हे दाखल करा...

Jagdish Pansare

AIMIM Political News : नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालयात १२ नवजात बालकांसह एकूण २४ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच संताप आणणारी घटना काल घडली. (Nanded Incident News) ठाण्यानंतर नांदेडमध्ये घडलेल्या या प्रकाराने राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात संतापाची लाट आहे. राजकीय नेत्यांकडूनही या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत.

औषधी पुरवठा नसल्याने हे मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आता नांदेडमध्ये राजकीय नेते, मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत. पण यातून साध्य काय होणार? गेलेले जीव परत येणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. (AIMIM) एमआयएमचे खासदार यांनी तर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे मृत्यू नसून थंड डोक्याने केलेले खून आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

एवढेच नाही तर या प्रकरणात रुग्णालयाचे अधिष्ठाता, राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आणि या खात्याच्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. (Marathwada) इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नांदेड रुग्णालयातील दुर्दैवी घटनेचा दाखला देत केलेल्या एक्स पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे.

हे मृत्यू नसून थंड रक्ताने केलेले खून आहेत. तरीही या घटनेला कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही. फक्त बनावट चौकशीचे आदेश दिले जातील. प्रत्येक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला वर्षानुवर्षे समान समस्यांचा सामना करावा लागतो. गरीब रुग्णांचा त्यांच्या नातेवाइकांचा आवाज कुणीही ऐकत नाही.

सरकारी इस्पितळांमध्ये मनुष्यबळ आणि सेवांच्या कमतरतेशी संबंधित मुद्दे उपस्थित केल्यानंतर, काहीही बदलले नाही. तेव्हा मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (47/22) दाखल केली आणि तेव्हापासून गोष्टी हलू लागल्या. पण अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आता फक्त कारवाई म्हणजे डीन आणि डायरेक्टर मेडिकल एज्युकेशनवर खुनाचा एफआयआर नोंदवणे, मंत्र्यांनाही सोडू नये, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी सातत्याने लोकसभेत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शासकीय वैद्यकीय रुग्णालये, महाविद्यालयातील सोयी-सुविधा, उपकरणे, औषध पुरवठा, तज्ज्ञ डाॅक्टर, तंत्रज्ञ, निवासी डाॅक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी या संदर्भात आवाज उठवला आहे. खंडपीठाने याची दखल घेऊन राज्य सरकार आणि वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभागाला खडसावत त्रुटी दूर करण्याचे आदेशही दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला व बाल रुग्णालयासाठीही इम्तियाज जलील पाठपुरावा करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT