अनिल कदम
देगलूर ः मराठवाड्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा व जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी जरब असणाऱ्या देगलूर- बिलोली मतदार संघातील नेतृत्वाला अनेक संधी आजपर्यंत मिळाल्या. दिवंगत मधुकरराव घाटे, गंगाधरराव देशमुख कुंटूरकर, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या रुपाने मंत्रिपद तर प्रदीर्घकाळ या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले खतगावकर यांना दोनदा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तर माजी आमदार सुभाष साबणे यांच्या रूपाने राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या तालिका सभापती पदाचा मानही या मतदारसंघाला मिळाला.
पूर्वी हा मतदारसंघ सर्वसाधारण होता, १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघात आताच्या तेलंगणा प्रदेशातील `जुकल` मंडळापर्यंतचा भाग समाविष्ट होता .यावेळी तालुक्याचे भूमिपुत्र वळग येथील रहिवाशी जयवंतराव मोरे यांना नेतृत्वाची संधी मिळाली, त्यांचा पक्ष ही होता कॉंग्रेसच. त्याकाळी द्विपद्धतीने लोकप्रतिनिधी निवडण्याची पद्धत अमंलात होती. त्यांच्याबरोबर नारायणराव नरसिंगराव व गणपतराव माणीकराव यांनाही नेतृत्वाची संधी मिळाली.
पुन्हा १९५७ ते १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्यांदा जयवंतराव मोरे वळगकर काँग्रेस, तर बिलाेलीतुन देशमुख व्यंकटराव बाबुराव, डांगे लक्ष्मणराव यांना ही संधी मिळाली त्यांचा ही पक्ष होता कॉंग्रेस. १९६७ ते १९७२ च्या निवडणुकीत जयराम गंगाराम आंबेकर बिलोली ,देगलूर मधून माजी समाज कल्याण राज्यमंत्री घाटे मधुकरराव रंगोजी या काॅंग्रेसींनी नेतृत्व केले.
१९७२ ते १९७७ दरम्यान देगलूरमधून आत्ताचे भाजपाचे उमेदवार सुभाषराव साबणे यांचे वडील पिराजीराव सटवाजीराव साबणे तर बिलाेलीतून जयराम गंगाराम आंबेकर विजयी झाले होते, दे देखील काँग्रेसचेच. एकंदरित या मतदारसंघावर कायम काॅंग्रेसचा पगडा राहिला.
पहिल्यांदा बिगर काँग्रेसी उमेदवार विजयी
१९७८ ते १९८० च्या जनता लाटेत या मतदारसंघातून जनता पार्टीचे आताचे जनतादल( सेक्युलर) चे नेते गंगाधरराव महाळपा पटणे यांनी विजय मिळवला. ते पहिले बिगर काॅंग्ेसी आमदार ठरले होते. मात्र दोन वर्षातच पुन्हा निवडणुकींना समोर जावे लागल्याने सर्वात कमी काळ त्यांना संधी मिळाली. १९८० साली झालेली येथील सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजली, त्याला कारणही तसेच होते.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई असलेले व त्या काळात उभरते नेतृत्व म्हणून भास्करराव पाटील खतगावकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांचा सामना काँग्रेस (एस )कडून दिवंगत ज्येष्ठ नेते बळवंतराव अमृतराव पाटील चव्हाण यांच्याशी झाला. सर्वार्थानी ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व विरुद्ध मराठवाड्याचे नेतृत्व अशी झाल्याने लक्षवेधी ठरली. मात्र या निवडणुकीत खतगांवकर यांचा थोडक्यात पराभव झाला.
परंतु पराभवानंतरही त्यांचे नेतृत्व पुढे बहरत गेले. १९८५ ते १९९० च्या दरम्यान गंगाधरराव कुंटूरकर यांना नेतृत्वाची संधी मिळाली पुढे त्यांना निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. १९९० ते १९९५ , १९९५ ते १९९९ या दरम्यान या मतदारसंघाचे नेतृत्व भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले.
नंतर खतगावकर लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर झालेल्या १९९९ ते २००४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ जागावाटपात जनता दलाला सोडण्यात आला. त्यावेळी गंगाराम ठक्करवाड यांना नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून त्यांनी नंतर भाजपाशी घरोबा केला.
शेवटची निवडणूक निर्णायक
२००४ साली झालेली विधानसभेची येथील सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची ठरली. शेवटच्या या निवडणुकीत लोकसभेत डी. बी. पाटील यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर शेवटच्या क्षणी काँग्रेसने भास्करराव पाटील खतगावकर यांना रिंगणात उतरवले. यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून गंगाराम ठक्करवाड हे होते.
मतदारसंघातील दोन प्रभावी राजकीय नेते चंद्रशेखर पाटील राजूरकर व माधवराव पाटील शेळगावकर यांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावून पाहिले. २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाला. मुंबई येथे अभियंता असलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांना खतगावकर यांनी मैदानात उतरवून निवडूनही आणले.
या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले मधुकरराव घाटे यांना शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याण, गंगाधरराव कुंटूरकर यांना निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे ,तर सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात भास्करराव पाटील खतगावकर यांना सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
तर भास्करराव पाटील खतगावकर यांना दोनदा लोकसभेतही जाता आले. साबने पिता-पुत्राला नेतृत्वाची संधी देणारा हा मतदारसंघ पुढे शिवसेनेकडून आमदार झालेल्या सुभाषराव साबणे यांना तालिका सभापतीपदावर विराजमान होण्याची संधीही मिळाली. मागील पंचवार्षिक काळातील तीन वर्षाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन महाराष्ट्र विधिमंडळाने साबणे यांचा गौरव केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.