राजुरा (जि. चंद्रपूर) ः दिवाळीनंतर नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्ष आपली रणनीती आखत आहे. राजुरा नगरपालिका काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राजुरा नगरपरिषदेचे सत्तांतर करण्यासाठी ‘काँग्रेस हटाव’ मोहिमेची रणनीती भाजपने आखलेली आहे. कॉंग्रेसला हटवण्यासाठी स्थानिक मित्र पक्षांशी युती करण्याचा कानमंत्र भाजपच्या स्थानिक नेत्यांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला आहे.
मुनगंटीवार यांचा मंत्र चालल्यास तीन माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे दिवाळी अगोदरच राजकीय वातावरण तापलेले आहे. राजुरा नगरपालिकेत स्थापनेपासून सर्वाधिक कार्यकाळ सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून राजुरा नगरपरिषद ओळखली जाते. राजुरा नगरपालिकेत एकूण 18 सदस्य आहेत. यांपैकी विद्यमान नगर परिषदेमध्ये काँग्रेसकडे नऊ सदस्य व एक अपक्ष असे एकूण १० सदस्य आहेत. नगरपालिका सभागृहात काँग्रेसचे 9, भाजप चे 3 सदस्य, शेतकरी संघटना 4 व अपक्ष दोन, असे पक्षीय बलाबल आहे. राजुरा नगरपालिकेच्या स्थापनेपासून सर्वाधिक कार्यकाळ पालिकेवर काँग्रेसचे सत्ता राहिलेली आहे.
विद्यमान नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सर्वाधिक तीन वेळा नगराध्यक्ष पद भूषविले आहे. जनतेमधून दोनदा थेट निवडून आलेले आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची नाडी अरुण धोटे यांना चांगलीच माहिती आहे. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने व इतर पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर यांनी कंबर कसलेली आहे. राजकीय अस्तित्वासाठी या प्रतिष्ठेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपले वर्चस्व राखण्यासाठी रणनीती तयार करीत आहे.
प्रत्येक राजकीय पक्षाने आपली मोर्चेबांधणी आत्तापासूनच सुरू केलेली आहे. अनेकांच्या नजरा नगराध्यक्षपदाकडे लागलेल्या आहेत. नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी अनेकांना डोहाळे लागले आहेत. राजकीय सारिपाटावर मतदारांचा कौल कोणाकडे असणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. राजुरा नगर परिषदेत सत्तांतर घडवून आणण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसत आहे. १८ ऑक्टोबरला झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस हटाव मोहिमेसाठी स्थानिक मित्र पक्षांशी युती करण्याचे सूतोवाच केले. यामुळे राजुरा नगर परिषदेतील निवडणुकीत रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे. काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजप आणि शेतकरी संघटनेची युती होण्याचे संकेत कार्यकर्त्यांच्या चर्चेतून मिळत आहेत.
भाजपकडे २ माजी आमदार ॲड. संजय धोटे आणि सुदर्शन निमकर आहेत. तर शेतकरी संघटनेकडे पक्षाचे सर्वोच्च नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांचे नेतृत्व आहे. काँग्रेसचे नेतृत्व आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे राहील. नगरपरिषद निवडणुकीत भाजप शेतकरी संघटना युती झाल्यास तीन माजी आमदार विरुद्ध विद्यमान काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्यात सामना होईल. राजुरा नगरपालिकेत मागील 35 वर्षांपासून सभागृहात असणारे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना शहरातील राजनीती चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे पालिकेवर सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान धोटे बंधूंकडे राहील.
सद्यपरिस्थितीत काँग्रेसची एकला चलो रे ही भूमिका आहे. भविष्यातील राजकीय बदलांनुसार महाविकास आघाडीचा मूलमंत्र काँग्रेस पक्ष घेणार काय, याकडेही इतर राजकीय पक्षांचे लक्ष आहे. राजुरा नगरपालिकेत सद्यःस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नसल्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या धोरणानुसार काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याचा सुर आहे. मात्र भविष्यातील राजकीय घडामोडी नुसार काँग्रेसची रणनीतीसुद्धा विरोधकांना आव्हान देणारी राहील, असे मानले जात आहे.
निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच चारही आजी-माजी आमदारांच्या रणनीतीबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगलेली आहे. 18 सदस्य असलेल्या सभागृहात बहुमत प्राप्त करण्याकरिता आर्थिक दृष्ट्य़ा सक्षम व लोकप्रिय उमेदवार निवडणे, यावर राजकीय नेतृत्वाचा डोळा आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांची चाचपणी सुरू झालेली आहे. राजकारणाच्या या सारिपाटावर कोण बाजी मारतो, हे मतदारच ठरवतील. मात्र सध्यातरी काँग्रेसला शह देण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.