Namita Mundada and Akshay Mundada
Namita Mundada and Akshay Mundada  Sarkarnama
मराठवाडा

"मला सोड अन्यथा... अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत" ; आमदार मुंदडांच्या पतीला धमकी

सरकारनामा ब्युरो

अंबाजोगाई : बीडच्या राजकारणात आज घडलेल्या एका घटनेने खळबळ उडवून दिली आहे. आज जिल्ह्यातील आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांच्या शिपाईंवर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्यांच्याकडील दिड तोळे सोन्यासह रोख रक्कम काढून घेतल्याच्या आरोपावरून शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यावेळी नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा (Akshay Mundada) शिपायाच्या मदतीला धावले असता, त्यांनाही ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार नमिता मुंदडा या त्यांच्या परिवारासह शुक्रवारी संध्याकाळी बीड रस्त्यावरील रसवंती गृहावर ऊसाचा रस पिण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा शिपाई मुराजी प्रकाश साखरे हे ऊसाचा रस पिऊन रसवंती गृहाच्या बाहेर आले. त्याच वेळी बाजूच्या हॉटेलमधून लखन भाकरे (रा. अंबाजोगाई) हा इसम अन्य ५ जणांसोबत तिथे आला. त्याने मुराजींच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडील दिड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि खिशातील ६ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन साथीदारांकडे दिले.

यावेळी मुराजीचा आरडाओरडा ऐकून नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा आणि अन्य काहीजण धावत आले. त्यांनी लखन भाकरे याला पकडले, मात्र त्याचे साथीदार शेजारच्या शेतात पळून गेले. यावेळी लखनने अक्षय मुंदडा यांना "मला सोड नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत आहे" अशी धमकी दिली. त्यानंतर अक्षय मुंदडा यांनी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि लखनला त्यांच्या हवाली केले. याच तक्रारीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात लखन भाकरे आणि अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार हे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT