भाजपमध्ये दुखावलेल्या नेत्यांची यादी वाढतेय; नाराजी दुर करण्याचे आव्हान!

Goa assembly election : यादीत सर्वच दिग्गज नेत्यांचा समावेश...
Narendra Modi and Utpal Parrikar
Narendra Modi and Utpal ParrikarSarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) भाजपमधील नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र यानंतर तिकीट न मिळालेल्या, डावललेल्या काही जणांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामधील काही जणांनी भाजपविरोधात थेट बंड करत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जुन्या भाजपला बाजूला करत आयात उमेदवारांना तिकीटं दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुरुवातीपासून ही यादी बघायची म्हटल्यास यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोडांवर या नेत्यांची नाराजी दुर करताना भाजपची चांगलीच दमछाक होणार हे नक्की.

या यादीत पहिला नंबर लागतो गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर :

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पणजीतून आपण अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना भाजपने पणजी (Panaji) विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले असल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यांना यापुर्वी भाजपने अन्य दोन मतदारसंघांचा पर्याय दिला होता. पण त्यांनी हे दोन्ही पर्याय नाकारत पणजीतून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी भाजपने विद्यमान भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले आहे.

Narendra Modi and Utpal Parrikar
भाजपमध्ये दुखावलेल्या नेत्यांची यादी वाढतेय; नाराजी दुर करण्याचे आव्हान!

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही नाराज

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Lakshmikant Parsekar) यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. तसेच मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पर्रीकर यांनी केंद्रात जाण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पार्सेकर यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. पण पर्रीकरांच्या याच उत्तराधिकाऱ्याला डावलण्यात आले आहे. पार्सेकर यांच्याऐवजी भाजपने दयानंद सोपटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सावित्री कवळेकर यांचेही बंड

गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांच्या पत्नी सावित्री कवळेकर (Savitri Kavlekar) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांनी गुरूवारी भाजपच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्या सांगे मतदारसंघातून भाजपला आव्हान देणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याही याच मतदारसंघातून इच्छुक होत्या. त्यांनी दोन दिवसांपूर्वी प्रचाराला सुरूवातही केली होती.

Narendra Modi and Utpal Parrikar
उत्पलला 'पणजीसाठी' शब्द दिला होता; देवेंद्र फडणविसांचा गौप्यस्फोट

दीपक पाऊसकरांचेही बंडाचे निशाण

गोवा सरकारमधील मंत्री दीपक पाऊसकर (deepak Pauskar) यांनाही तिकीट नाकारण्यात आल्याने ते नाराज होते. अखेर त्यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पाऊसकर हे 2017 मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून पहिल्यांदाच आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची आशा होती. पण ऐनवेळी त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. (Goa Election Update)

गोवा विधानसभा उपाध्यक्ष इसिडोर फर्नांडिस :

आमदार इसिडोर फर्नांडिस यांनीही भाजपविरोधात (BJP) लढण्याचा निर्णय घेतला आहे. फर्नांडिस यांनी काल आमदारकीचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा काल दिला. गोव्याच्या काणकोण मतदारसंघाचे ते आमदार होते. मात्र त्यांच्या जागी भाजपने रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली आहे. काल समर्थकांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. दरम्यान फर्नांडिस यांना समजावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com