Osmanabad : पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या राजकीय खेळीने जिल्ह्यातील राजकारणात चांगलाच हंगामा होत आहे. कधी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjeetsingh Patil) तर कधी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी त्यांनी जवळीक साधल्याने राजकीय पटलावर वादळ पाहायला मिळते आहे. मात्र यामुळे कार्यकर्त्यांची गोची झाली असून जनतेने देखील या राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही आमच्या प्रश्नाचं काय? असा सवाल केला आहे.
गेल्या सात-आठ महिन्यापासून ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि शिंदे गटाचे तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यात राजकीय वाद रंगला होता. पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच सावंत यांनी महाविकास आघाडी शासनाच्या काळातील अनेक कामे रद्द केली, तर काही थांबविली. (Osmanabad) त्यामुळे राजेनिंबाळकर यांचे कट्टर विरोधक भाजपचे आमदार पाटील यांच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.
त्यानंतर सावंत यांनी आपल्या खास शैलीमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे राणा पाटील यांना पुरेसा निधी न दिल्याच्या कारणावरून त्यांची थेट तक्रार मंत्रालयात केली. त्यामुळे सावंत चांगलेच खवळले, त्याचाच परिपाक म्हणून शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने रविवारी ठाकरे गटाशी सावंत यांनी जुळवून घेत आमदार, खासदार यांच्या खांद्यावर हात ठेवला.
त्यातून नवाच संभ्रम निर्माण करत त्यांनी राज्यभरात चर्चा घडवून आणली. महाविकास आघाडी शासनाच्या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना पदावरून खाली खेचण्यात सावंत यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्याच सावंतांसोबत राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आले होते. पालकमंत्रीपद मिळालेल्या सावंतांनी महाविकास आघाडीच्या काळातील कोट्यवधी रुपयांची कामे थांबविली. त्याचवेळी शिवसैनिकांनी शहरात आमरण उपोषण केले.
मात्र आता नव्या राजकीय समिकरणात थांबविलेली कामे पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे. या शिवाय गेल्या सहा-सात दिवसापासून शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. पालिकेने वीजबील न भरल्याने महावितरण कंपनीने कनेक्शन तोडले आहे. सात ते आठ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याशिवाय सुटणारच नाही. मात्र शहरातील पाणी प्रश्नाकडे पालकमंत्री सावंत यांना ढुंकूनही पाहिले नाही.
शहरातील नागरिक पालकमंत्र्यांच्या अखत्यारित येत नाही का ? असा प्रश्न विचारला जात आहे. आमदार-खासदारही याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या घश्याची कोरड किती दिवस राहणार ? हा खरा प्रश्न आहे. शहरातील रस्ते उखडले आहेत, त्यांची दुरुस्ती होत नाही. पालिकेत निधीचा खडखडाट आहे, जिल्हा नियोजनचा निधी अखर्चित राहत आहे. पण जिल्ह्यातील नेत्यांना मात्र याचे सोयरसुतक नाही.
युती शासनाच्या काळात बाहेरच्या जिल्ह्यातील अनेक पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले. प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन, स्वातंत्र्यदिन, मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन अशा कार्यक्रमांना तत्तकालिन पालकमंत्री जिल्ह्यात आवर्जून हजेरी लावायचे. अन्य कार्यक्रमांना मात्र ते जिल्ह्यात फारसे येत नसायचे. परिणामी झेंडामंत्री म्हणून नागरिकांकडून त्यांचा उल्लेख केला जायचा. सुदैवाने तानाजी सावंत हे जिल्ह्यातील पालकमंत्री आहे. मात्र त्यांचे जिल्ह्यातील दौरे पाहता त्यांचीही गणना तशीच होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.