Ranajagjitsinha Patil Sarkarnama
मराठवाडा

Tuljapur constituency : तुळजापूरमध्ये बाजी पलटणार ? राणाजगजितसिंह पाटलांची प्रतिष्ठा पणाला; कोणाचे आहे आव्हान ?

सरकारनामा ब्युरो

Dharshiv News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता जागावाटपात काय होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता तुळजापूर मतदारसंघात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

येत्या काळात त्यांच्या पुढे बरीच आव्हाने असल्याने येत्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 2019 साली राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तत्पूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे 1999 पासून सलग चार वेळा निवडून आले होते. भाजपच्या (BJP) तिकीटावर राणा जगजितसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा पराभव करत पहिल्यांदाच तुळजापूरात कमळ फुलवले.

तुळजापूर मतदारसंघात स्थापनेपासून काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आलटून-पालटून निवडून येत होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्व. माणिकराव खपले हे 1978 , 1985 आणि 1995 साली येथून निवडून आले होते. तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे 1990 आणि 1999 ते 2014 पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. राणा राणजगजितसिंह पाटील यांच्या निमित्ताने 1985 नंतर पहिल्यांदाच तिसरा आमदार लाभला.

राणा जगजितसिंह पाटील यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर

2019 साली राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना महायुतीमधील शिवसेनेचीही साथ लाभली. धाराशिवचे खासदार आणि पाटील यांचे चुलत भाऊ ओमराजे निंबाळकर यांनीही युतीधर्म पाळला. मात्र त्यानंतर युती तुटली आणि महाविकास आघाडीने आकार घेतला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षातून धाराशिव लोकसभेसाठी निवडणुकीत उतरविले. मात्र चुलत भाऊ ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अर्चना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.

राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून येथे उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी शरद पवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवला आहे. त्यामुळे यंदा तुळजापूरची विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोक जगदाळे, सक्षणा सलगर यांची नावे चर्चेत आहेत

'मविआ'त काँग्रेसचा दावा

भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व्यंकटराव गुंड यांनीही तुळजापूर विधानसभेत रस दाखविला आहे. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसकडून याठिकाणी दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे इच्छुक आहेत तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा खासदार असल्यामुळे शिवसेनेकडूनही हा मतदारसंघ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वंचितचे मतदान कोणाला मिळणार ?

2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. काँग्रेसला मिळणारी पारंपरिक मते त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने स्वतःकडे वळविली. काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांचा 23 हजार मतांनी पराभव झाला होता. तर वंचितचे उमेदवार अशोक जगदाळे यांना 35 हजाराहून अधिक मतदान घेतले होते. जवळपास 15 टक्के मतदान घेणाऱ्या वंचितमुळे काँग्रेसच्या मतदानात विभाजन झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीची ताकद लोकसभेला दिसलेली नाही. त्यामुळे ही मते यंदा कुणाकडे जातात? त्यावर निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT