Mla Sanjay Shirsat-Pradeep Jaiswal
Mla Sanjay Shirsat-Pradeep Jaiswal Sarkarnama
मराठवाडा

चोवीसशेचा डाय, चौदाशेची दाढी ; बंडखोर आमदारांची गुवाहाटीच्या हाॅटेलात मज्जाच भारी..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात आणि देशात एकच चर्चा होती आणि ती म्हणजे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या ५० आमदारांनी गुवाहाटीच्या हाॅटेलमधील दिवस कसे घालवले? याचे अनेक किस्से आता समोर येत आहेत. औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी `साम`, टीव्हीला दिलेल्या मुलाखतील सर्व आमदारांचा रोजचा दिनक्रम, तिथल्या गंमती-जंमती, रोज होणाऱ्या चर्चा ते खाणे-पिणे याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

शिंदे यांच्यासह बंड पुकारलेले शिवसेनेचे सुरवातीला २० आणि अपक्ष मिळून एकूण २५ आमदार होते. त्यांना सुरतमधील एका अलिशान हाॅटेलात ठेवण्यात आले होते. (Aurangabad) त्यानंतर शिंदे गटाला जसजसा पाठिंबा वाढत गेला आणि येणाऱ्या मंत्री, आमदारांची संख्या वाढत गेली तशी या सगळ्यांची रवानगी थेट आसाम मधील गुवाहाटीच्या रॅडीसन ब्लु या पंचतारांकित हाॅटेलात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या हाॅटेलात केसांचा डाय चोवीसशे रुपये तर दाढी चौदाशे रुपयांत केली जाते. यावरून हे हाॅटेल किती महागडे होते याचा अंदाज येतो.

आमदार संजय शिरसाट यांनी `साम``शी बोलतांना सांगितले, सुरुवातीला हाॅटेलमध्ये आम्ही टीव्ही वरच्या बातम्या पाहण्यातच वेळ घालवायचो. पण सगळ्या चॅनलवर त्याच त्याच बातम्यांमुळे आम्हाला कंटाळा आला. मग आम्ही पाच-सहा आमदारांच्या ग्रुपमध्ये राहून एकमेंकाशी गप्पा मारायचो. अपक्ष कुणी पुर्वाश्रमीचा काॅंग्रेसचा असलेला असे सगळ्या पक्षांचे आमदार असल्याने प्रत्येक जण त्यांचा अनुभव सांगायचा. आमच्या पक्षात असे असते, तसे असते अशा चर्चांनी आमचा दिवस सुरू व्हायचा.

साधरणता सकाळी साडेनऊ वाजता नाश्ता झाला की आम्ही हाॅटेलातील मोकळ्या हाॅलमध्ये जमा व्हायचो. कुणी स्वीमिंग करायचे, कुणी लाॅनवर फेरफटका मारायचे. पण कुणालाही हाॅटेलच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. जागोजागी पोलिसांचा खडा पहारा असायचा. पण वातवरण मोकळे होते, सगळे आनंदात हसत खेळत संपुर्ण हाॅटेलचा परिसर पालथा घालायचे.

दुपारचे जेवण पुन्हा चार वाजता चहा आणि रात्रीच्या जवेणाआधाी गप्पा-गोष्टी व्हायच्या. या निमित्ताने अनेकांच्या अंगातील कलागुणांचे दर्शन देखील झाले. आमचे गुलाबराव फार छान गातात, अगदी तालासुरात. याशिवाय उर्दू भाषा आणि शेरोशायरीत देखील त्यांचा हातखंडा होता. असे अनेकजण होते जे आपली कला एकत्रित जमल्यावर सादर करायचे.

डाय, दाढी महागात पडली..

एकदा हाॅटेलातील मेन्स पार्लरमध्ये मी आणि प्रदीप जैस्वाल गेलो. मला केसांना डाय करायचा होता तर प्रदीपला दाढी. आम्ही दोघांनी डाय, दाढी केली. पण जेव्हा त्या कर्मचाऱ्याने बील सांगितले तेव्हा मात्र आम्ही चिकितच झालो. कारण डायचे त्या सलूनमध्ये चोवसीसशे तर दाढीचे चौदाशे रुपये घेतले. तेव्हा आम्हाला फाईव्हस्टार हाॅटेलातील महागाईचा अंदाज आला. हाॅटेलातील जेवण अत्यंत रुचकर होते, महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण मिळाल्यामुळे खाण्या-पिण्याची गैरसोय कधीच झाली नाही.

गुवाहाटीच्या हाॅटेलमध्ये रोज दोन-तीन नवे आमदार, मंत्री दाखल होत होते, त्यामुळे ` अरे ये भी आया गया`, अशा चर्चा रंगायच्या. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त हाॅटेल बाहेर आणि आता देखील होता. अगदी वेटरच्या वेशात देखील पोलिसा बारकाईने लक्ष ठेवून होते. आमदारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आल्यामुळेच ही काळजी घेण्यात आली होती. आम्हाला ते वेटर नसल्याचा अंदाज आला होता. आमच्यापैकी एकाने त्याला जवळ बोलावून विचारले देखील, की तुम वेटर नही लगते, तेव्हा आधी तो मानायलाच तयार नव्हता, पण मग त्याने कबुल केले की आम्ही पोलिस आहोत, त्यांच्या कमरेला लोडेड पिस्तुल कायम असायचे, असे देखील शिरसाट यांनी सांगितले.

दरम्यान, प्रसार माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांचे हसू यायचे, जे घडत नव्हते ते देखील दाखवले जायचे. भाजपचे नेते आम्हाला कधीच प्रत्यक्ष हाॅटेलात भेटले नाही. एकनथा शिंदे यांचीच त्या नेत्यांशी भेट व्हायची. दिवसभरात किंवा रात्री त्यांच्यात जी काही चर्चा व्हायची, ठरायचे ते शिंदे साहेब आम्हाला एकत्रित हाॅलमध्ये बोलावून सांगायचे. कुठलीच गोष्ट अंधारात नव्हती. फडणवीस साहेब तर प्रत्यक्ष आम्हाला भेटलेच नाही. फक्त व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून ते आमच्याशी संवाद साधायचे, असेही शिरसाट यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT