Mahadev Jankar- Sanjay Jadhav  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency: जानकर यांचा दावा दोन लाखांच्या मताधिक्याचा, तर जाधव म्हणतात हॅटट्रिक तर करणारच!

Mahadev Jankar vs Sanjay Jadhav : मतदानाला अवघे अकरा दिवस शिल्लक राहिल्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचाराला वेग

Jagdish Pansare

Parabhani Election 2024 News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे अकरा दिवस शिल्लक राहिल्यामुळे महायुती-महाविकास आघडीसह वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे.

परभणीत महायुतीचे महादेव जानकर, महाविकास आघाडीचे संजय जाधव(Sanjay Jadhav) आणि वंचितचे पंजाबराव डख यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. महादेव जानकर यांनी आधी माढा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक त्यांनी आपला मोर्चा परभणीकडे वळवला. महायुतीतील राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून जानकरांना जागा दिली आणि साताऱ्याचे जानकर परभणीचे उमेदवार झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी प्रचारात अनपेक्षित आघाडी घेत ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. दोन टर्म आमदार अन् दोन टर्म खासदार असताना परभणीकरांना दहा दहा दिवस पाणी का मिळत नाही? असा सवाल करत जाधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे, तर परभणीचा विकास तुम्ही साताऱ्यातून येऊन करणार आहात का? असा पलटवार जाधवांकडून केला जातोय.

मतदानाची वेळ जवळ येईल तशी या दोन उमेदवारांमधील आरोप-प्रत्यारोपांना धार येणार आहे. मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्यभरात ओबीसी समाजाने काढलेले एल्गार मोर्चा या दोन घटनांमुळे या लोकसभा निवडणुकीला जातीचे स्वरूप आले आहे. धनगर, ओबीसी, मराठा, वंचित घटक अशा वेगवेगळ्या गटांत मतदार विभागले गेले आहेत.

प्रचारादरम्यान, जाधव-जानकर यांना मराठा समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत महादेव जानकर आपण दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत, तर संजय जाधव म्हणतात मी हॅटट्रिक करणारच. आता परभणीकर कोणाच्या बाजूने कौल देतात यावरच मताधिक्य आणि हॅटट्रिक अवलंबून असणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात परभणीत राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत, याचा मतदारांवर किती परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT