Aurangabad District Bank News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad District Bank : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांमध्ये चुरस..

Jagdish Pansare

Marathwada Political News : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेव्हा राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी काबीज केली होती. सहकार क्षेत्रामध्ये तेव्हाच्या शिवसेनेला मिळालेले हे पहिले आणि मोठे यश होते. (District Bank Election News) परंतु शिंदे गटाच्या उठावानंतर या बँकेचा सगळा कारभार सत्तार यांच्या हाती आला. वर्षभरातच सत्तार यांचे त्यांनीच नेमलेल्या अध्यक्ष नितीन पाटील यांच्याशी बिनसले आणि आता नवीन अध्यक्ष निवडण्याची वेळ आली.

कुठल्याही राजकारण्यासाठी जिल्हा बँक ताब्यात असणे महत्त्वाची बाब समजली जाते. त्यामुळे शिंदे गटाचे जिल्ह्यातील दोन मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? होणार हे उद्याच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार असले तरी काल झालेल्या संचालकांच्या गुप्त बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. (Aurangabad) आता समर्थकाला अध्यक्षपदावर बसवण्याऐवजी हे पद आपल्याकडेच राहावे यासाठी सत्तार, भुमरे प्रयत्नशील आहेत.

भुमरे यांचा डोळा गेल्याच वेळी अध्यक्षपदावर होता, परंतु जिल्हा बँक ताब्यात आणण्यासाठी सत्तारांनी घेतलेले कष्ट पाहता भुमरेंनी एक पाऊल मागे घेतले होते. (Marathwada) आता मात्र ते थांबण्याच्या मानसिकतेत नाहीत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भुमरेंसाठी जिल्हा बँक ताब्यात असणे फायद्याचे ठरणार आहे. स्वतः लोकसभा लढवण्याच्या विचारात असलेल्या भुमरे यांना पैठणमधून आपल्या मुलाला उमेदवारी द्यायची आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हाती असेल तर या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा भुमरेंचा प्रयत्न आहे. दुसरीकडे असेच काहीसे धोरण अब्दुल सत्तार यांचे देखील आहे. परंतु सत्तारांना पाहिजे ती मदत करण्याच्या अटीवर ते भुमरेंचा मार्ग मोकळा करून देऊ शकतात, अशी देखील चर्चा आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणे ही राज्य पातळीवर त्या आमदार, खासदार किंवा मंत्र्यासाठी प्रतिष्ठेची आणि अभिमानाची गोष्ट समजली जाते.

राज्य पातळीवर अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकजण जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सांभाळून राज्याचे राजकारण करताना दिसतात. त्याच पंगतीत बसण्याचा प्रयत्न भुमरे-सत्तार यांच्याकडून सुरू आहेत. अध्यक्षपदाची निवड उद्या होणार असली तरी या दोघांपैकी एकाच्या गळ्यात ही माळ पडण्याची दाट शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT