Uddhav Thackeray On Marathwada Flood News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : फडणवीस सरकारने जाहिरातबाजीवर पैसे उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी! उद्धव ठाकरे बरसले

Flood in Marathwada : शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला हे सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत.

Jagdish Pansare

  1. उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जाहिरातींवर पैसे उधळल्याचा आरोप केला.

  2. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून १०,००० कोटी पॅकेज द्यावे अशी मागणी केली.

  3. ठाकरे यांनी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असा जोरदार पवित्रा घेतला.

Marathwada Flood News : पाण्याच्या दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. निसर्गापुढे कोणाचे काही चालतं नाही हे खरे असले तरी अशा नैसर्गीक संकटात बळीराजा आणि सर्वसामान्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असते. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी, पूराने अक्षरशः थैमान घातले आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी होत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.

स्वतःच्या जाहीरतबाजीवर पैसे उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या, पंचनामे आणि नियम तपासणीत वेळ घालवू नका. तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात आधी पैसे जमा करा मग शहानिशा करत बसा, अशी सूचनाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला केली आहे. मराठवाड्यातील पूर परिस्थिती, शेती, घर, पीकांचे नुकसान या सगळ्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

सध्या मराठवाड्यात (Marathwada) सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती.

पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला. पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही, केली ती अतिशय तुटपुंजी मदत होती.

शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला हे सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला हे सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि डीसीएम यांना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे. आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? असा प्रश्नही ठाकरे यांनी सरकारला केला.

दहा हजार कोटींची मदत जाहीर करा

केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावेत, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका.

पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा. जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा आणि स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

FAQs

प्रश्न 1. उद्धव ठाकरे यांनी नेमकी कोणती मागणी केली?
शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून १०,००० कोटींचे मदत पॅकेज द्यावे.

प्रश्न 2. ठाकरे यांनी सरकारवर कोणता आरोप केला?
सरकार जाहिरातींवर पैसे खर्च करत असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

प्रश्न 3. मदत कोणत्या शेतकऱ्यांसाठी मागितली आहे?
आपत्तीग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मागितली आहे.

प्रश्न 4. ठाकरे यांची टीका कोणत्या सरकारवर आहे?
महाराष्ट्रातील महायुती सरकारवर.

प्रश्न 5. ठाकरे यांच्या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय झाला?
सरकारविरोधात विरोधक अधिक आक्रमक झाले आणि चर्चा तापल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT